लोहोणेर : गावापासून एक किलोमीटर अंतरावर देवळा रस्त्यावर असलेल्या छत्रपती हॉटेलच्या लाकडी बैठक शेडला आज पहाटे अचानक आग लागल्याने सुमारे चार ते साडेचार लाख रु पयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या बाबत घडलेली घटना अशी की, लोहोणेर - देवळा रस्त्यावरील गट नंबर ६१९ मध्ये असलेल्या हॉटेल छत्रपतीच्या बैठक शेडला पहाटे अचानक आग लागली. या शेडला लागून असलेल्या रूम मध्ये काही कामगार झोपलेले होते.शेडला लागलेल्या आगीच्या उष्णतमुळे सदर रूमची काच तडकल्याने कामगारांना जाग आली तो पर्यत आगीने रौद्ररूप धारण केले होते. हॉटेल कामगार व लगतच्या शेतकर्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने सटाणा नगरपंचायतीच्या अिग्नशमन दलाच्या बंबला पाचारण करण्यात आले. या आगीत १६ टेबल, २५ खुर्च्या, (सर्व लाकडी ) , आठ इलेक्तिट्रक पंखे, सी सी टी व्ही कॅमेरा, ३० पत्रे,गर्डर पाईप, इंटिरिअर फर्निचर, लाईट फिटिंग, असे एकूण चार ते साडे चार लाखांचे साहित्य जळून खाक झाले. सटाणा नगरपालिका अग्निशमन दलाचे जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. लोहोणेर येथील तलाठी अंबादास पुरकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.
हॉटेलच्या बैठक शेडला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 1:56 PM