नाशिक : घरगुती वापराचा गॅस विविध चारचाकी वाहनांमध्ये भरून देणारा मोठा अड्डा शुक्रवारी पोलिसांनी उद््ध्वस्त केला. या कारवाईत गॅस भरण्याच्या तीन इलेक्ट्रिक मशीनरीसह तब्बल १२५ भरलेले आणि २१ रिकामे असे १४६ सिलिंडर पोलिसांनी हस्तगत केले. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, पसार झालेल्या त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या अवैध धंदेविरोधी पथकाने केली.मोसिन शब्बीर खान (रा. म्हाडा कॉलनी, सामनगाव) व कवीराज अनुराज वाघेरे (रा.भारती मठ, सुभाषरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर फारूख (रा. नाथ इस्टेट, महाराजा बसथांबामागे लॅमरोड) व सना हे दोघे संशयित पसार झाले आहेत. फारूख याच्या लॅमरोड भागातील घरात संशयित मोसिन खान आणि कवीराज वाघेरे हे दोघे हा अड्डा चालवित होते. अवैध धंदेविरोधी पथकास या अड्ड्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सहायक निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या पथकाने नाशिकरोड पुरवठा निरीक्षक आनंद गुप्ता यांच्यासमवेत छापा टाकला असता तेथे मारुती व्हॅन (एमएच १५ सीडी ९७४४) या वाहनात घरगुती सिलिंडरमधून बेकायदा गॅस भरताना दोघे रंगेहात पोलिसांच्या हाती लागले. संशयितांच्या ताब्यात एचपी कंपनीचे ९८, भारत गॅस कंपनीचे ७ व अन्य २० असे १२५ भरलेले गॅससिलिंडर तसेच भारतचे व्यावसायिक वापराचे २१ रिकामे असे १४६ सिलिंडर मिळून आले. घटनास्थळावर गॅस भरण्याचे तीन इलेक्ट्रिक मशीन आणि दोन वजनकाटे असा सुमारे ३ लाख ५४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईत एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर सापडल्यामुळे शहरातील घरगुती गॅस तुटवडाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घरगुती गॅस भरणारा अड्डा पोलिसांकडून उद््ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:53 PM