सिन्नर : लक्ष्मीची आराधना करून ती प्राप्त करणे म्हणजेच परिश्रमाने व सन्मार्गाने मिळविणे होय. वाममार्ग, क्रोध, मत्सर, लोभ, भ्रष्ट व्यवहार, वाममार्गाने जाणारे धन ही अलक्ष्मीची लक्षणे आहेत. त्यांचा नाश झाला पाहिजे. तरच लक्ष्मीची प्राप्ती होऊन जीवन सुखी-समाधानी होते. चांगल्या मार्गाने मिळविलेल्या पैशांतूनच घरात सुख येत असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या ४६ व्या ग्रंथालय सप्ताहास बुधवारी सायंकाळी डॉ. गोविलकर यांच्या ‘पैसा की लक्ष्मी’ या व्याख्यानाने प्रारंभ झाला. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, नरेंद्र वैद्य, कार्यवाह हेमंत वाजे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.चांगल्या मार्गाने पैसा मिळवून त्याचा चांगल्या कामासाठी विनियोग, संचय व एकूणच कुटुंब, समाजाचे व देशाचे जीवन सुखी-समाधानी होण्यासाठी कार्य करणे म्हणजे लक्ष्मीची आराधना ही पैशाची व्यापक संकल्पना संस्कृतीत असल्याचे गोविलकर यांनी सांगितले. झटपट मिळणारा पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. ती स्थिर नसते. त्यातून समाधान व सुख मिळत नसल्याचे ते म्हणाले.धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार गोष्टी मिळविणे म्हणजे पुरुषार्थ असे आपल्या संस्कृतीत म्हटले आहे. पैसा प्राप्त करणे हे पुरु षार्थाचे लक्षण आहे. पण हा पैसा परिश्रम करून चांगल्या मार्गाने मिळविला पाहिजे. वाममार्गाने येणारा पैसा चोरून लपून येतो. तर कष्टसाध्यतेतून येणारे धन वाजत गाजत येते. त्यालाच आपण लक्ष्मी असे म्हणतो. केवळ पैसा मिळवून कोणाला सुखी होता येत नाही. चांगल्या मार्गाने मिळविलेल्या पैशातून घरात सुखी समाधानी व आनंदी वातावरण, मुले, नातवंडे, धन-धान्याने भरलेले व बहरलेले घर, हे लक्ष्मी संपादन केल्याचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.पैसा मिळविणे हे ध्येय नको तर समाधान मिळविणे हे ध्येय पाहिजे. चित्ती असू द्यावे समाधान ही संकल्पना सुखाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. पैसा मिळविण्यासाठी प्रत्येकजण धडपड करीत असतो. अनेकजण पैसा सर्वस्व मानतात; पण पैशांनी श्रीमंत झाले म्हणजे सुखी होता येते असेही नाही. आपल्या संस्कृतीत पैशांची व्याख्या लक्ष्मी या संकल्पनेशी निगडित असून, ती सन्मार्ग व कष्टातून साध्य झाली तरच जीवन सुखी व समाधानी होते असे त्यांनी सांगितले.वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णा भगत यांनी प्रास्ताविकात वाचनालयाचे कार्य व ग्रंथालय सप्ताहाच्या परंपरेची माहिती दिली. व्याख्यानाचे प्रायोजक संपत पाटील यांचा पुंजाभाऊ सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माधवी पंडित यांनी सूत्रसंचालन केले.
चांगल्या मार्गाने मिळविलेल्या पैशातून घरात सुख येते: गोविलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 6:37 PM