नाशिक : ‘मराठी असे आमुची माय बोली’, किंवा ‘माझ्या मराठीचे बोलू, अमृताचेही पैजा जिंकी’ केवळ असे म्हणून मराठी भाषेचा विकास होणार नाही़ तर त्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करावे लागतील़ सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत परंतु त्याच बरोबर वैयक्तिक पातळीवर महाराष्ट्रातील घराघरातून मायबोलीसाठी प्रयत्न करावे लागतील असे मत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले़मराठी भाषा वाचवा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत त्यासाठी संवाद मराठी व्हायला हवा़ सरकारने देखील शाळाशाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करायला हवा़ इंग्रजी भाषेच्या वाढत्या वापरामुळे मराठीत अनेक शब्द लोप पावत चालले आहेत़ नव्या पिढीला मराठीतील अनेक शब्द माहित नाहीत़ कारण त्यांच्या जीभेवर इंग्रजी शब्दांनी ठाण मांडले आहे़ भावना व्यक्त करताना आपण इंग्रजीचा आधार शोधतो़ आपल्या जन्मापासून मराठीचे उच्चार कानावर पडत असताना आपल्याला त्या मातृभाषेचा संकोच वाटावा ही खरी शोकांतिका आहे़ अशी खंतही कवी, लेखकांनी व्यक्त केली़मराठी शाळा, महाविद्यालयांकडचा मराठी माणसांचा ओढा कमी झाला आहे़ परिणामी गेल्या दशकातील नवी पिढी आपली बोलीभाषा बाजूला ठेऊन घरातही इंग्रजीचा वापर करू लागली आहे़ त्यासाठी घरातही हट्टाने मराठी बोललं गेलं पाहीज.- दत्ता पाटील, नाट्य लेखकइंग्रजी भाषेने आपल्या जिभेवर ठाण मांडले आहे़ त्यामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारात बोलताना आपण इंग्रजी भाषेचा वापर करतो़ एकमेकांना संदेश पाठविताना देखील थँक्यू, सॉरी याचा वापर करतो़ त्याऐवजी धन्यवाद, क्षमा असावी, माफ करा असे म्हणता येऊ शकते़ आपल्या घरात देखील मोठ्या माणसांनी मराठीचा वापर केला तर लहान मुले देखील मग इंग्रजी ऐवजी मराठीतच बोलतील़- संजय चौधरी, ज्येष्ठ कवीनव्या पिढीमध्ये मराठीचा वापर व्हावा म्हणून मी आपल्या घरापासून सुरुवात केली़ इंग्रजी शिक्षणाची सोय असताना माझ्या मुलांना मराठी शाळेत पाठविले़ आम्ही मुलांशी घरात मराठीतच संवाद साधतो़ अगदी बारीकसारीक गोष्टीची समज मुलांना मराठीतच यायला हवी़ मुलांनी मराठी पुस्तके वाचावीत म्हणून वेगवेगळ्या मराठी पुस्तकांची नावे आपण त्यांना सांगायला हवीत म्हणजे कुतुहल वाढेल़ आपल्या घरावर, दुकानांवर तसेच वाहनांवर देखील मराठी भाषेतच नावे टाकायला हवीत़- प्रकाश होळकर, साहित्यिक
महाराष्ट्रातील घराघरांत व्हावा माय मराठीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:54 PM