कळवण : वंचितातील वंचित घटकाला आपल्या हक्काचे घर मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसोबत शबरी आवास व रमाई आवास योजनेची तरतूद अनुसूचित जाती-जमाती (पात्र) लाभार्थींसाठी करण्यात आली आहे. चांगल्या घरासोबत वीज, पाणी, शौचालय अशा सर्व भौतिक सुविधा तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोचविण्यासाठी ग्रामस्तरावर एकजुटीने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन कळवण गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी केले.कळवण तालुक्यातील गोबापूर येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून गाव, पाडे, वस्ती येथे चांगले शिक्षण, चांगले आरोग्य व चांगले राहणीमान यासाठी प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. लाभार्थींनी योजनांना सकारात्मक प्रतिसाद देत त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करायला हवा.दरम्यान, कळवण तालुक्यातील सर्व ८६ ग्रामपंचायतीअंतर्गत घरकुल योजनेबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीने निवड केलेल्या पात्र लाभार्थींची आवश्यक कागदपत्रांची नोंदणी संकेतस्थळावर केली जाणार आहे. तसेच ज्या लाभार्थीस स्वत:ची जागा नाही अशांना जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा लाभ घेता येईल. यासंबंधीही ग्रामसभांमधून मार्गदर्शन करण्यात आले आहे.ग्रामपंचायत गोबापूर येथे झालेल्या विशेष ग्रामसभेसाठी कळवण पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी शिवाजी जाधव, सरपंच यशोदाबाई कुवर, उपसरपंच प्रकाश गांगुर्डे, माजी सरपंच गंगाधर खांडवी, दादाजी गांगुर्डे, भरत गायकवाड, ग्रामसेवक आसिफ शेख यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
वंचितांना मिळणार हक्काचे घर
By admin | Published: April 24, 2017 1:13 AM