नाशिक : आजवर सर्व्हे नंबर वा गल्ली, चौकाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तुमच्या-आमच्या घरांना आता आधार क्रमांकाप्रमाणे युनिक क्रमांक देण्याचा व घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्याची जबाबदारी सेंट्रल कमर्शियल इंडस्ट्री आॅफ इंडिया या खासगी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शहरी भागात राबविण्यात येणाऱ्या या योजनेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून करण्यात येऊन कुंभमेळ्यानंतर नाशिकमधील घरांना युनिक क्रमांक मिळणार आहे. नगर विकास मंत्रालय व मुख्य निवडणूक आयोग यांच्या संगनमताने हा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार प्रत्येक घर, व्यावसायिक दुकान, हॉटेल अशा प्रत्येक मालमत्तेला कायमस्वरूपी क्रमांक देण्यात येणार आहे. त्याचा वापर जनगणना, निवडणूक, पोस्ट, सर्वेक्षण, रेशन, कर आकारणी, वीज, पोलीस, कृषी, कोर्ट केसेस, रोजगार निर्मिती अशा २१ कारणांसाठी उपयोग होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात शहरी भागात म्हणजे महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेला युनिक क्रमांक देण्यात येणार असून, त्यानंतर ग्रामीण भागातही प्रत्येक गाव, वाडी, वस्तीनिहाय त्याचे सर्वेक्षण करण्यात येईल.
घरांनाही मिळणार कायमस्वरूपी क्रमांक
By admin | Published: June 05, 2015 12:25 AM