नाशिक : महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अंदाजपत्रकात घरपट्टीमध्ये एकूण १४ टक्के तर पाणीपट्टीत प्रतिवर्षी १ टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. याशिवाय, विविध योजनांसाठी जाणारा मनपाचा हिस्सा पाहता यंदा भांडवली कामांसाठी १३०.५८ कोटी रुपयेच उपलब्ध होणार असल्याने विकासकामांना पुरेसा वाव नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नव्यानेच निवडून आलेल्या सदस्यांना प्रभागातील विकासकामांसाठी झगडावे लागणार आहे. महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक प्रभारी आयुक्त बी. राधाकृष्णन् यांनी स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांना सोमवारी (दि.१७) सादर केले. आयुक्तांनी १४१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करताना त्यात महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न १२२८.९२ दर्शविण्यात आले आहे. तर स्पीलओव्हर ६०७.७२ कोटी रुपये नमूद करण्यात आला आहे. महापालिकेचा बंधनात्मक खर्च हा ८७५.७४ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय, त्यामध्ये महापालिकेला विविध योजनांसाठी द्यावा लागणारा स्वत:चा हिस्सा प्रामुख्याने, सिंहस्थ कामे १० कोटी, जेएनएनयूआरएम ३०.१८ कोटी, मुकणे धरण ६० कोटी, भूसंपादनासाठी ७०.६४ कोटी, सिंहस्थ भूसंपादनाकरिता २४.५० कोटी, स्मार्टसिटीसाठी ५० कोटी, अमृत योजनेकरिता २० कोटी, प्रधानमंत्री आवास योजनेकरिता १० कोटी, १९ टक्के राखीव निधी म्हणून ६७.१० कोटी, इतर उचला रकमा ५५.३५ कोटी व अखेरची शिल्लक ५.९८ कोटी वजा जाता महापालिकेला भांडवली कामांसाठी केवळ १३०.५८ कोटी रुपयेच उपलब्ध होणार आहेत. सन २०१५-१६ च्या तुलनेत सन २०१६-१७ मध्ये विकासकामांत ४४.४७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात विकासकामांवरील खर्चात २४.१८ टक्क्यांची घट धरण्यात आलेली आहे.
घरपट्टी-पाणीपट्टीत दरवाढ प्रस्तावित
By admin | Published: April 18, 2017 1:52 AM