इंदिरानगर : शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल योजनेंतर्गत घरकुले देण्यात आली. परंतु भारतनगर व चेतनानगरलगत असलेल्या घरकुल योजनेतील काही लाभार्थ्यांनी घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. ते पुन्हा झोपडीमध्येच राहण्यास आल्याने शहर झोपडपट्टीमुक्त होण्यास खोडा बसणार आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी शिवाजीवाडी, भारतनगर, नंदिनीनगरसह परिसरातील वसाहतींमध्ये महापालिकेच्या वतीने घरकुल योजनेत बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या झोपड्यांची पाहणी केली. त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे जमाही करण्यात आली होती. त्याप्रमाणे गेल्या वर्षात दोन टप्प्यात भारतनगरलगतच्या घरकुल योजनेतील घरांचे सोडत पद्धतीने क्रमांक काढून घरे वाटप करण्यात आली होती. तसेच भगतसिंग वसाहतीमध्ये दोन वर्षांपूर्वी मनपाच्या वतीने लाभार्थ्यांची पाहणी करून यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार चेतनानगरलगत असलेल्या घरकुल योजनेतील घरे वाटप करण्यात आली. परंतु भारतनगर आणि चेतनानगरलगतच्या घरकुल योजनेतील काही लाभार्थ्यांनी सुमारे एक ते दोन महिने मनपाच्या वतीने घरात मालक राहता का नाही, याची तपासणी केली असता काही घरे सुमारे १५०० रुपये भाडेतत्त्वावर दिली असल्याचे आढळले. स्वत: मात्र पुन्हा झोपड्यांमध्ये पूर्वीच्या जागेवर राहात असल्याचे आढळून आले. त्यामुळे शासन व मनपाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून शहर झोेपडपट्टीमुक्त करण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
झोपडपट्टीतील रहिवाशांची घरकुले भाडेतत्त्वावर
By admin | Published: August 05, 2016 1:34 AM