नाशिक- शहरातील वकील, डॉक्टर, सीए, वास्तुविशारद, कर सल्लागार यांना निवासी दराने घरपट्टी आकारण्याच्या महत्वपूर्ण प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेने मंजुरी दिली आहे. मात्र, त्याच बरोबर घरगुती स्वरूपात उद्योग करणाऱ्यांना देखील याच दराने घरपट्टी आकारण्याची महत्वाची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली.
महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेतखाली मंगळवारी (दि.१९) पार पडली. यावेळी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. डॉक्टर, वकील, वास्तुविशारद, सीए यांच्यासह बौद्धिक व्यवसाय करणारे सर्व घटक निवासी मिळकतीत प्रॅक्टिस करीत असल्यास त्यावर अनिवासी नव्हे, तर निवासी दराने घरपट्टी आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या कर विभागाने महासभेवर ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने व्ही. शशिधरण यांच्यासंदर्भात १९८४ मध्ये केलेल्या न्यायनिवाड्यात निवासी मिळकतीत बौद्धिक व्यवसाय करणारे वकील, डॉक्टर व तत्सम वर्गवारीतील व्यक्ती निवासी वापराच्या मिळकतीत प्रॅक्टिस करीत असतील, तर त्यांच्याकडून अनिवासीऐवजी निवासी दराने कर आकारणी करावी, असे म्हटले आहे, त्याच आधार घेऊन केलेला प्रस्ताव महासभेत विनाचर्चा मंजुर झाला. मात्र, त्याचवेळी गृह उद्योगांना सवलत देण्याचा निर्णय देखील महापौरांनी घोषीत केला. सध्या घरोघर अनेक प्रकारचे व्यवसाय केले जातात आणि कुटूंब प्रमुखाच्या चरीतार्थाला हातभार लावला जातो. त्यांना देखील लाभ मिळणार आहे.
दरम्यान, कश्यपी धरणासाठी जमिनी देणाऱ्या ३६ प्रकल्पग्रस्तांना मनपाच्या सेवेत घेण्याचा निर्णय पुन्हा एकदा स्थगित करण्यात आला आहे. शासनाकडे प्रलंबीत असलेला आकृतीबंध मंजुर झाल्यानंतर त्या रिक्त जागा भरण्याच्या वेळी या प्रस्तावाचा विचार करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहे.