नाशिक : नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल अर्थात कॅट्सच्या प्रतिबंधित क्षेत्रात मुख्य धावपट्टीपासून 800 मीटर उंचीवर अज्ञात ड्रोनच्या घिरट्या रात्रीच्या सुमारास लष्करी जवानांना दिसल्या. यासंदर्भामध्ये कॅट्सच्या जवानांनी हे ड्रोन फायरिंगद्वारे पाडण्याची तयारी केली असता ड्रोन हे त्यांच्या प्रतिबंधित क्षेत्रातून गायब झाले.
याबाबत कॅट्सकडून अधिकृतरित्या उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील 'नो ड्रोन फ्लाईग झोन' जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये कॅट्सचादेखील समावेश आह. यानंतर कॅट्सच्या प्रशासनाने त्यांच्या संरक्षण कुंपणासह पुणे महामार्गावरील दर्शनी भागात 'नो ड्रोन झोन' असे ठळकपणे सचित्र इशारा दिलेला असतानाही असा गंभीर प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत अज्ञात ड्रोन कोणी उडवले, याचा शोध आता उपनगर पोलीस घेत आहेत. संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.