नाशिक : नाचे नंदलाल नचावे हर की मय्या, सुन मय्या मोरी मैने नही मख्खन खायो, एरी सखी का से कहू मे कान्हा की चतुराई या आणि अशा विविध हिंदी गीतांवर आधारित नृत्य नाट्यप्रयोगातून श्रीकृष्णाचा जीवनपट उलगडून दाखवण्यात आला. निमित्त होते. रोटरी क्लब आॅफ नाशिक आणि कलानंद कथक नृत्य संस्थेतर्फे आयोजित ‘कृष्णकथा’या नाट्यप्रयोगाचे. शुक्रवारी (दि. १९) महाकवी कालिदास कलामंदिर येथे या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.कृष्णकथा या नृत्यनाटिकेतून भगवान कृष्णाच्या जन्मापासूनच्या विविध घटनांवरील दृश्य नृत्यातून साकार करण्यात आले. कलानंद संस्थेच्या ४५ कलावंतांनी सादर केलेल्या या प्रयोगास पे्रक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. बालपणातल्या कृष्णाच्या नटखट रूपातील बाल कलाकारांनी या बाल कृ ष्णाचे विशेष कौतुक केले. गोकूळनगरीतील दृश्य उभारतानाच कालिया मर्दन या नृत्यातील कृष्ण आणि कालिया नाग यांच्यातील नृत्य जुगलबंदीने प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले.कैसी बजावियो श्याम बासुरी या गाण्यावर आधारित नृत्याने कृष्णाची बासरी ऐकून गोपिकांचा कशा वेड्या होतात याचे नृत्यनाट्यरूप सादर करण्यात आले. गोकूळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या नृत्यनाट्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना कृष्णलीलांवर आधारित विविध जीवनपट बघायला मिळाला. या नृत्यनाट्याचे दिग्दर्शन संजीवनी कुलकर्णी आणि सुमुखी अथनी यांनी तर संगीत दिग्दर्शन प्रशांत महाबळ यांनी केले होते. यावेळी रोटरी क्लब आॅफ नाशिकचे अध्यक्ष अनिल सुकेणकर, सविदानंद सरस्वती, आर्कि. विवेक जायखेडकर, मनीष शिंदे, राधेय येवले, मिलिंद देशपांडे आदि उपस्थित होते. या नाट्यप्रयोगातून संकलित झालेल्या निधीतून आदिवासी मुलांना सायकल उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)
कैसी बजावियो श्याम बासुरी...
By admin | Published: August 20, 2016 1:08 AM