नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे हे जनताच ठरवेल, मात्र जे म्हणतात आमचा राष्ट्रवादी पक्ष बेकायदेशीर आहे ते राष्ट्रवादीच्या नावानेच मंत्री कसे झाले, या बेकायदेशीर पक्षाच्या नियुक्त्या तुम्ही कशा केल्या असा सवाल करून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचा समाचार घेतला. त्याचबरोबर जे पक्ष सोडून गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असा दावाही केला आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांचे शनिवारी (दि.८) नाशकात आगमन झाले. राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात पवार यांनी नाशकातून केली असून, त्या निमित्ताने प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधतांना पवार यांनी पक्षातून गेलेल्यांवर शरसंधान केले. प्रफुल्ल पटेल यांनी देशपातळीवर विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याच्या प्रश्नावर बोलतांना पवार यांनी, देशातील ८० टक्के भागात भाजप नाही त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीची भीती भाजपाला वाटू लागली असून, त्यातूनच त्यांनी विरोधी पक्षांना फोडण्याचे कारस्थान सुरू केले आहे.
त्यासाठी आमदार फोडा, खोक्या संस्कृतीचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा सारा प्रकार संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने घातक असल्याचे सांगितले. बिहारच्या पाटणा येथे झालेल्या बैठकीत १८ देशपातळीवरील पक्षाचे नेते उपस्थित होते. त्यात प्रत्येक पक्षाचे काही प्रस्ताव असले तरी, सर्वांची एकजूट व्हावे यासाठी सर्वच आग्रही होते. बैठकीत काहींची मतभिन्नता होती. मत मांडणे चुकीचे काहीच नाही. मात्र सर्वांनी एकमताने निर्णय घेतला व आता पुढील रणनीतीसाठी येत्या १७ जुलै रोजी बंगळुरू येथे बैठक घेण्याचे निश्चित झाले असल्याचे पवार यांनी सांगितले.