नाशिक : ‘प्लॅस्टिकबंदी ठीक आहे, पण प्लॅस्टिकच्या पिशव्या नसल्याने कपडे मळताय, तांब्या-पितळेची भांडी काळी पडताय, खाद्यपदार्थ, दही-लोण्यासारखे पातळ पदार्थ ग्राहकांना कसे द्यायचे, ग्राहकांची समजूत कशी काढायची?’ असे संवाद आता शनिवारी बाजारात भाजीविक्रेते, कपडे व्यापारी, भांडी व्यापारी, बेकरी व्यावसायिकांकडून ऐकू येऊ लागले आहेत. प्लॅस्टिकबंदीनंतरची ही अवस्था! राज्य शासनाने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला. तीन महिने आहे ते प्लॅस्टिक जमा करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी मुदतही दिली. आता मात्र २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असून, बंदी असणारे प्लॅस्टिक वापरताना दिसल्यास दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पर्यावरणदृष्ट्या हा विषय महत्त्वाचा असून, त्याचे स्वागत झाले पाहिजे आणि समर्थनही मिळाले पाहिजे; परंतु हा निर्णय अंमलात आणताना असंख्य अडचणी समोर येत आहे. प्रत्यक्ष बाजारातील व्यवहारात काय? प्लॅस्टिकबंदी निर्णयानंतर पर्यायी साधन म्हणून कापडी बॅग, कागदी बॅग यांचा पर्याय दिला जात असला तरी सर्वच गोेष्टींना तो सोयीस्कर ठरत नसल्याचे अनेकांच्या बोलण्यातून समोर आले. त्यामुळे आता शासनाच्या हेतूला समर्थन दिले जात असले तरी अडचणी पाहता प्लॅस्टिकबंदी विषयावरून वाद सुरू आहेत. नवीन कपडे, बेकरी पदार्थ, दही, लोणी, खवा यांसारखे द्रव पदार्थ आदींच्या खरेदी-विक्रीत अडचणी वाढल्या आहेत. त्यातच पावसाळा येऊ घातल्याने मालाचे संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिकचे आवरण सर्वत्र पहायला मिळत असताना ते पॅकिंग काढण्याची लगबग दिसून येत आहे. प्लॅस्टिकचे संरक्षण आता फार काळ मिळणार नसल्याने दुकानदार चिंतेत पडले आहे. अशा साऱ्या कोलाहलाचा बाजारातील हा आखो देखा हाल.परराज्यातून येणा-या प्लॅस्टिकचे काय?शहरात येणारा बहुतांशी माल (साड्या, ड्रेस, कापड) गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दक्षिण भारत आदी ठिकाणांहून येतो. त्या राज्यात प्लॅस्टिकला बंदी नाही. त्यामुळे सर्व माल प्लॅस्टिकमध्येच पॅकिंग करून येणार असल्याने त्याचे काय करायचे? त्यामुळे आमच्यावर कारवाई होणार का?, आता माल आल्यावर प्लॅस्टिक पिशव्या काढत बसण्याचे काम वाढणार का? असे असंख्य प्रश्न कपडे बाजारात व्यावसायिकांकडून उपस्थित केले जात आहेत.भाज्या, फळे, फुले, कपड्यांची साठवणूक प्लॅस्टिकमध्येचबाजारात फेरफटका मारल्यानंतर विक्रीसाठी दुकानात, रस्त्यावर, गाड्यांवर ठेवलेला माल हा मोठमोठ्या प्लॅस्टिक पिशवीतच साठवून ठेवलेला दिसला. पारदर्शकता या प्लॅस्टिकच्या गुणामुळे तो ग्राहकांना चटकन दिसतो. व्यापारी, विक्रेते यांना तो हाताळताना सोपे जाते. ऊन, वारा, पाऊस यात तो प्लॅस्टिकमुळे टिकून राहतो. यामुळे भाजीपाला, फळे, फुले, रस्त्यावरील कपडे आदी गोष्टींची साठवणूक प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये दिसून आली. शिवाय यामुळे माल धूळ, मातीपासून सुरक्षितही राहतो. आता प्लॅस्टिकबंदीची आणखी कडक कारवाई सुरू झाल्यावर या व्यापारी, विक्रेत्यांनाही पर्याय शोधावे लागणार आहेत.
आम्ही व्यवसाय कसा करावा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:09 AM