सायखेडा : गोदाकाठ भागात सायंकाळी सहा वाजेपासून कडाक्याच्या थंडीला सुरवात होते. सायंकाळी घराबाहेर शेकोट्या पेटविल्या जातात. खेड्यात आठ वाजता घरांची दारे बंद होतात. सकाळी दहा वाजेपर्यंत हवेत गारवा असतो, अकरा वाजता रस्त्यावर रहदारी सुरु होते. अशा कडाक्याच्या थंडीत शेतात जाऊन रात्रभर पिकांना पाणी कसे देणार? आठ अंश तापमानात एक तास घराबाहेर पडणे शक्य नाही अशा वेळी रात्रभर पाटाच्या पाण्यात उभे राहून पाणी कस द्यायच असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात सायखेडा शाखा अभियंता यांना निवेदन देण्यात आले. भारनियमन वेळेत बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहेनिफाड तालुक्यात कडाक्याची थंडी आहे. तालुक्यातील सर्वाधिक थंडी गोदाकाठ परिसरात असते. पाण्याचा प्रदेश, काळी कसदार जमीन, ऊस आणि नगदी पिके यामुळे सर्व शिवार ओलसर असल्याने पाण्याचे दव पसरून हवेत गारवा निर्माण होत असतो. त्यामुळे मोठी थंडी या भागात आहे. सुगीचे दिवस आहे. शेतात नगदी पिकांची लागवड केली आहे. पिकांना सातत्याने पाणी द्यावे लागते, या अगोदरची खरीप हंगामातील पिके अवकाळी पावसामुळे खराब झाली होती. आता केवळ रब्बी हंगामातील पिकांवर शेतकर्यांचे अर्थकारण अवलंबुन आहे अशा परिस्थितीत पिकांना पाणी गरजेचे आहे मात्र वीज वितरण कंपनीने भारनियमन वेळेत बदल केला आहे. रात्री बारा वाजता वीज पुरवठा सुरु केला जातो , प्रचंड थंडी, बिबट्याचा धुमाकूळ अशा परिस्थितीत रात्री शेतात जाऊन रात्रभर पिकांना पाणी देणे कठिण आहे.थंडीच्या दिवसात किमान दिवसा वीजपुरवठा सुरु ठेवावा असे निवेदन देण्यात आले. वीजपुरवठा दिवसा सुरु न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे निवेदनात सोनगाव, सायखेडा, रामनगर, पिंपळगाव (निपाणी )येथील शेतकर्यांच्या सह्या आहे निवेदन देण्यासाठी अनिकेत कुटे , सोनगावचे सरपंच अंकुश गायकवाड, बाळु सुकेणकर यासह शेतकरी उपस्थित होते.
कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी कसे देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 2:31 PM