नाशिक : रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाने मास्क न घालता दवाखान्यात येण्यास डॉक्टरला जबाबदार मानणे हे हास्यास्पद आहे. त्यासाठी डॉक्टरवर कारवाई करणे, त्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे भान संबंधित यंत्रणेने राखावे असे आयएमएच्यावतीने कळविण्यात आले आहे.
हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला मास्क घालून या, असेच डॉक्टर सांगत असतात. तसेच बहुतांश डॉक्टर्स तर पीपीई किट घालून सर्व विपरीत परिस्थितीचा सामना करीत असतात. अशा परिस्थितीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकानी मास्क घातला नाही म्हणून त्या डॉक्टरवर कारवाई करणे ही हसण्याजोगी गोष्ट आहे .गत वर्षापासून पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि आमदार, खासदारांपासून मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरापर्यंतचे सर्व पदाधिकारी हे सर्व मास्क वापरण्यास सांगत असूनही मास्क न वापरणारे महाभाग मुंबई, दिल्लीत लोकलमध्ये, रेल्वेमध्ये, बसेसमध्ये, रस्त्यांवर, शहरांमध्ये खेड्यांमध्ये दिसत आहेत. मग या बेजबाबदार नागरिकांसाठी संबंधित प्रशासनांना दंड केला का ? केला नसेल तर कुणाला दंड करावा असा जाबदेखील आयएमएतर्फे विचारण्यात आला आहे. ही बेफिकिरी समाजामध्ये दिसत असून त्यासाठी डॉक्टर जबाबदार नाही आणि प्रशासन देखील नाही. समाजाला मास्कचे महत्व उमगले असले तरी पण जबाबदारी घेण्याची कुवत नाही. कदाचित त्यामुळेच मुख्यमंत्री महोदयांनी मी जबाबदार ही हाक दिली असावी, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.समाजात मास्कबाबत जनजागृती करण्यात डॉक्टरांचा सर्वाधिक पुढाकार असताना अशा प्रकारे पाच हजार रुपयांचा दंड रुग्णाच्या बेफिकिरपणापायी डॉक्टरांना करणे ही कारवाई अत्यंत चुकीची असल्याचेही आयएमएच्यावतीने कळविण्यात आले आहे.
इन्फो
डॉक्टरांना वेठीस धरणे अयोग्य
डाॅक्टरांवर अशी चुकीची कारवाई करून चुकीचा पायंडा पडू नये. ही कारवाई तात्काळ थांबवावी. आणि मास्क न घालणाऱ्या बेफिकिर व्यक्तीवरच व्यक्तिगत कारवाई करावी. डॉक्टरांना लोकांच्या बेजबाबदार वर्तनासाठी वेठीस धरणे हे योग्य नव्हे.
डॉ. समीर चंद्रात्रे, आयएमए