नाशिकरोड : सध्या सत्यावर असत्य मात करण्याचा प्रयत्न करीत असून, खोटं बोला पण रेटून बोला, अशी प्रवृत्ती वाढत आहे. मात्र जात-पात न मानता रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जेलरोड ज्ञानेश्वरनगर येथे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शंभूराजे गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन्हीही छत्रपती युगपुरुष होते. मात्र छत्रपती संभाजी राजांचा इतिहास काही प्रवृत्तींनी खोटा व चुकीच्या पद्धतीने सांगितला, मांडला हे खरोखरच दुर्दैवी आहे. दोन्ही छत्रपतींनी ४०० वर्षांपूर्वी जात-पात, धर्माचे राजकारण न करता रयतेचे स्वराज्य स्थापन केले. मात्र आता एकसारखा जातीय तणाव निर्माण केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेली दंगल, काही दिवसांपूर्वी कोरेगांव भीमा येथे झालेला प्रकार जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. जाणीवपूर्वक असे प्रकार घडविले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. आपल्याकडे इतकी साखर आहे ती आपण इतर राष्टÑांना देऊ शकतो. तरी देखील पाकिस्तानमधुन साखर आयात करून आपल्या शेतकऱ्यांची साखर मातीमोल किमतीत करण्याचे काम केंद्र व राज्य शासन करीत असल्याचा आरोप पवार यांनी केला. शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न सोडविले जात नाही. उलट त्यांच्या समस्या, अडचणी वाढत चालल्या आहेत. दोन्ही छत्रपतींना हे मान्यनव्हते. त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले असे पवार यांनी स्पष्ट केले. सध्या जे आरक्षण आहे त्याला धक्का न लावता इतरांना आरक्षण दिलेच पाहिजे. स्वच्छतेच्या नावाने फोटोसेशन केले जात आहे. तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांना मागे करून फोटोबाजी केली जात आहे. यामध्ये लोकसहभाग अत्यंत कमी आहे. जातीयवाद्याचे राजकारण लक्षात घेऊन प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची पाळी आली आहे. अन्याय, अत्याचाराला बळी न पडता दोन्ही छत्रपतींचे विचार व आचरण डोळ्यासमोर ठेवुन वाटचाल केल्यास समाजाचा विकास व प्रगती होईल असे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार जयंत जाधव, राष्टÑवादीचे शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार दिलीप बनकर, नाना महाले, अर्जुन टिळे, श्रीराम शेटे, रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुणे, अनिता भामरे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक योगेश निसाळ यांनी केले. आभार मनोहर कोरडे यांनी मानले. यावेळी सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास व कार्याची माहिती पोवाड्यातून दिली.
छत्रपतींचा आदर्श ठेवावा : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:46 AM