नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सेनेशी युती करावी किंवा नाही याची पक्षश्रेष्ठींशी चर्चा करायला भाजपा नेते मुंबईला रवाना झालेले असताना दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ केला. संघटनेत कोणती पदे भूषविली, कधीपासून काम करता यासह संघटनेसाठी अंगावर किती गुन्हे दाखल झालेत, अशा प्रश्नांची विचारणा करून, उमेदवारी न दिल्यास पक्षासोबत राहणार काय, असा शब्द इच्छुकांकडून सोडून घेण्यात आला. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडे सर्वाधिक इच्छुक असून, ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी ८१० इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज सादर करून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. एकेका प्रभागात आठ ते दहा इच्छुक असल्याने त्याचे पडसाद सोमवारी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पहावयास मिळाले. सकाळी १० वाजेपासूनच इच्छुक उमेदवार त्यांच्या समर्थकांसह पक्ष कार्यालयात येऊन धडकले, हातात आजवर केलेल्या कामांचे अहवाल पुस्तिका घेऊन दाखल झालेल्या इच्छुकांकडून आपल्यालाच उमेदवारी कशी मिळेल याचे दाखले दिले जात होते. शिवसेना भवनात जागा अपुरी पडल्याने कार्यालयाच्या बाहेर मंडप उभारण्यात येऊन त्याठिकाणी इच्छुक व त्यांच्या समर्थकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक एकपासून मुलाखतींना सुरुवात करण्यात आली. संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ताजी गायकवाड, नगरसेवक सुधाकर बडगुजर, शिवाजी शहाणे, जयंत दिंडे, महिला संघटक श्यामला दीक्षित यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी इच्छुकांना विविध प्रश्न विचारण्यात आले. पक्षात केलेले कार्य, विविध आंदोलनातील सहभाग, स्वत: राबविलेले कार्यक्रम, सामाजिक संस्था व उत्सव मंडळातील सहभाग, संपर्क, प्रभागातील राजकीय परिस्थिती, प्रभागातील जाती निहाय प्राबल्य, प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध, संपर्क, उमेदवाराची वैयक्तिक माहितीही यावेळी जाणून घेण्यात आली. शिवसेना महानगरच्या वतीने राबविण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत प्रभागात प्रत्यक्ष दिलेल्या भेटी, कुटुंबाची माहिती, फोन क्रमांक, छायाचित्रे याची माहितीही घेण्यात आली. मंगळवारीही या मुलाखती घेण्यात येणार असून, त्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येईल व उमेदवारीबाबत तेच अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती विजय करंजकर, अजय बोरस्ते यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
संघटनेसाठी किती गुन्हे दाखल झालेत?
By admin | Published: January 24, 2017 1:00 AM