नाशिक : शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने बांधलेले आयटी पार्क तब्बल अठरा वर्षांपासून वापराविना पडून असून त्याचे दर कमी करून देखील कोणी गाळे घेण्यास तयार नाही. त्यात आता राज्य शासनाने राजीव गांधी आयटी पार्क करण्याचे ठरवले असून त्याचाही बदलत्या काळात कितपत उपयोग होईल, अशी शंका उपस्थित केली जात आहे. विशेषत: बहुतांश आय टी कंपन्यांनी आता कोरोनामुळे वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला असताना आयटी पार्कला कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी शंका आहे.
आयटी क्षेत्राला चांगले दिवस असताना अंबड औद्यागिक वसाहतीत भूखंड क्रमांक ५४ वर २००३ मध्ये आयटी पार्क बांधण्यात आले आणि तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री (स्व.) प्रमोद महाजन यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले; परंतु नंतर या पार्कला प्रतिसाद मिळाला नाही. औद्योगिक विकास महामंडळाने अनेक वेळा लिलाव काढून देखील या तीन मजली पार्कच्या गाळ्यांना प्रतिसाद नाही. मध्यंतरी आयटी क्षेत्रातील काही बड्या कंपन्यांनी संपूर्ण पार्क ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, औद्योगिक विकास महामंडळाचे धोरण आड आले. एखादी इमारत वापराविना पडून असल्याने तिचा घसारा वाढणार आहे. त्यामुळे बांधीव मिळकतींची किंमत कमी होत असताना प्रत्यक्षात मात्र दरवेळी लिलावाचे दर वाढवण्यात आले. त्यामुळे आयटी पार्कला प्रतिसादच मिळत नसल्याने तो वापराविना पडून आहे. त्यात आता नव्या आयटी पार्कची भर पडणार आहे.
गेल्या ८ मार्च रोजी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी आयटी पार्क सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकला आणखी एक पार्क मिळणार असले तरी एक वापराविना पडून असताना दुसऱ्या आयटी पार्कला कितपत प्रतिसाद मिळणार असा प्रश्न आहे.
कोट...
नाशिकमध्ये सध्या असलेला आयटी पार्क काहीच कामाचा नाही. तो पाडून नव्याने बांधावा लागेल. राज्य शासनाने नवीन आयटी पार्क मंजूर केला आहे. त्याचे स्वागतच आहे. तो स्टार्ट अप उद्योगांना उपयुक्त ठरेल. कारण मोठ्या आयटी कंपन्यांनी सध्या वर्क फ्रॉम होमवर भर दिला असल्याने त्यांना अशा प्रकारच्या पार्कची कितपत गरज पडेल याविषयी शंका आहे.
- पीयूष सोमाणी, सीएमडी, ईएसडीएस, नाशिक
इन्फो...
आयटी पार्कसारखे प्रकल्प राबवताना आता लवचीक धोरण असले पाहिजे. अन्यथा अगोदर वापराविना पडून असलेल्या प्रकल्पाप्रमाणेच हा प्रकल्प बासनात जाईल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.
===Photopath===
150321\15nsk_16_15032021_13.jpg
===Caption===
अंबड औद्योगिक वसाहतीत वापराविना पडून असलेली आयटी पार्कची इमारत.