नाशिक : देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरताना दिसत असतानाच कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ची भीती वाढू लागली आहे. कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरूपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. जिल्ह्यात मुळातच लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्याच अवघी ७ टक्क्यांच्या आत असताना त्याला रोखणार कसे, असा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून आले असल्याने त्याला कसे रोखायचे, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अद्याप डेल्टा प्लस ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ अर्थात ‘उत्परिवर्तन अवस्थेत’ आहे. कोरोना व्हायरसचं डबल म्युटेशन सर्वात अगोदर महाराष्ट्रात आढळून आलं होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरियंट रुग्णांच्या रोग प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. भारतात सर्वात अगोदर आढळून आलेल्या ‘डेल्टा व्हेरियंट’मध्ये बदल होऊन ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ तयार झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्रेक दिसून आला. त्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले होते. संसर्ग आटोक्यात आल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी आता पुन्हा डेल्टा प्लस या नव्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे बाजारपेठांमधली गर्दीही वाढत आहे.
कोरोनाच्या ज्या स्ट्रेनमुळे देशात दुसरी लाट आली होती, त्या स्ट्रेनमध्ये झालेल्या नवीन बदलांमुळे आता तो अधिक प्राणघातक झाला आहे. या नवीन स्ट्रेनला डेल्टा प्लस असे नाव देण्यात आले आहे. डेल्टा प्लसचा मूळ विषाणूपेक्षा दुप्पट वेगाने प्रसार होऊ शकतो.
इन्फो
डेल्टा प्लसचे वास्तव
प्रत्येक विषाणू स्वत:ला मजबूत बनवण्यासाठी आपली मूलभूत रचना बदलत असतो. हे बदल नंतर व्हायरसच्या नवीन रूपास जन्म देतात. कोरोना विषाणूने बऱ्यांच वेळा स्वतःला बदलले आहे, ज्याला आपण वेगवेगळ्या व्हेरिएंटचे नाव देण्यात आले आहे. भारतात कोरोना व्हायरसचा डबल म्युटंट स्ट्रेन मिळाला होता. ज्याला डेल्टा असे नाव देण्यात आले. या डेल्टामध्ये बदल झाल्यानंतर नवीन व्हायरस तयार झाला आला असून त्याचे नाव डेल्टा प्लस आहे.
इन्फो
डेल्टा प्लस संक्रमित रुग्णांमधील लक्षणे
दुस-या लाटेदरम्यान कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये जी लक्षणे दिसून आली, त्याच्याशी साधर्म्य साधणारी लक्षणेच डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये आढळली आहे. यामध्ये खोकला, सर्दी, अतिसार, ताप, डोकेदुखी, खाज सुटणे, छातीत दुखणे, चव नसणे आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी सर्व लक्षणे समाविष्ट आहेत. डेल्टा प्लस संक्रमित रुग्णांमध्ये सध्या ओटीपोटात दुखणे, भूक न लागणे यासारखी नवीन लक्षणेदेखील दिसून येत आहेत.
इन्फो
१८ ते ४४ वयोगटात तर अवघे १ टक्का
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला काहीसा वेग देण्यात आला आहे. मात्र, लसीकरणाची परवानगीच १८ वर्षावरील वयोगटासाठी सगळ्यात उशिरा करण्यात आली आहे. त्यामुळे या वयोगटातील एकूण सुमारे १७ लाख नागरिकांपैकी केवळ १ टक्का नागरिकांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे.
------------------
ही डमी आहे.