नाशिक : शहरात येणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत अनेकदा ते गढूळ आणि दर्पयुक्त असल्यच्या तक्रारी असल्या की, त्यानंतर प्रशासन धावपळ करते. तथापि, नागरिकांना दिले जाणारे पाणी हे शुद्ध असावेत, यासाठी दररोज तब्बल सत्तर पाणीपुरवठा नमुने घेतले जातात. त्याचा अहवाल आल्यानंतर त्या त्या भागात जाऊन दुरुस्ती केली जात असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
नाशिक शहराला तीन धरणांंमधून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अत्यंत मोठा आणि सक्षम असला, तरी अनेक ठिकाणी उणिवाही आहेत. दररोज कुठे ना कुठे गळती होते आणि पाणी वितरण करताना अडथळे येतात आणि अनेकदा दूषित पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात त्यामुळेच जलजन्य आजार हेात असतात. अर्थात, महापालिकेच्या दृष्टिकेानातून कागदावर उत्तम नियोजन आहे. त्यानुसार, जलशुद्धिकरण केंद्राच्या ठिकाणी पाणीपुरवठा यांत्रिकी विभागाच्या वतीने नमुने घेतले जातात. त्याचप्रमाणे, वितरण विभागाकडूनही दररोज सुमारे सत्तर नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले जातात. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, त्यानुसार कामकाजात सुधारणा केली जाते. अर्थात, ही खूप नियमित बाब झाली असून, त्यामुळे अनेकदा प्रत्यक्ष नागरिकांना गढूळ पाणीपुरवठ्याचा झाल्यावर आराडाओरड होते. मग सुधारणा केली जाते.
कोट...
नाशिक महापालिकेच्या जलवितरण विभागाच्या माध्मयातून दररोज नमुने घेतले जातात, परंतु त्याचबराेबर शुद्धिकरण केंद्राच्या माध्यमातूनही नमुने तपासले जातात. शासकीय लॅबबरोबरच ते एमपीसीबीलाही पाठविले जातात.
- संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग
------
सर्व प्रभागातून घेतले जातात पाण्याचे नमुने
नाशिक महापालिकेचे सहा विभाग असून ६१ प्रभाग आहेत. सर्व विभागात महापालिकेने पाणी नमुने तपासणीसाठी घेतले जातात. त्यासाठी खास कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी पाणीपुरवठ्याच्या वेळी विविध रहिवासी भागात जाऊन पाण्याचे नमुने घेतात. दर आठवड्याला सत्तर ते ऐंशी नमुने घेतल्यानंतर, त्यातील पाच ते सहा नमुन्यात दूषित दाखविले जाते. स्थानिक परिस्थितीची पाहणी करून त्यात सुधारणा केली जाते.
...........
अशी हाेते तपासणी
नाशिक महापालिकेच्या वतीने दररोज किमान सत्तर ते ऐंशी पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या शासकीय प्रयोगशाळेत हे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. त्याचा साप्ताहिक अहवाल प्राप्त होतो. त्यानुसार, पुढील कार्यवाही होते. मनपाच्या पाथर्डी फाटा आणि गंगापूर जलशुद्धिकरण केंद्र येथे तर मनपाची स्वत:ची प्रयोगशाळा असून, तेथेही यांत्रिकी विभाग तपासणी करतो.