कळवण : शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी देता येत नाही. वीज खंडीत झाल्यास शेतीचे नुकसान होत असल्यामुळे नवीबेज परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून वीज पुरवठा तोडल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. रोहित्रावरील वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करु नका अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.नवीबेज येथे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन आंबेडकर, अभियंता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांसमवेत बैठक झाली. कंपनीने वीज बिल वसुली नावाखाली वीजतोडणी सुरू केली असून त्याचे पडसाद उमटले. वीजबिलाची थकबाकी आहे. त्यासाठी कंपनीचे कर्मचारी थेट रोहित्राचा वीजपुरवठा खंडीत करीत आहेत. याचा परिणाम शेतीवर होत आहे.त्यामुळे नियमित वीज बिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाल्यास जबाबदार धरण्यात येऊन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा माजी सरपंच चंद्रकांत पवार यांनी दिला.पाणी असून वीज नसल्याने पाणी देता येत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत न करता सुरळीत करण्याची मागणी देविदास पवार, कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष घन:श्याम पवार यांनी केली. वीजतोडणीची मोहिम केली जात असल्याने मुकी जनावरे तहानाने व्याकूळ होऊ लागली आहेत . त्यामुळे वीज खंडीत करु नये अशी मागणी शेतकरी वर्गातून झाली. अशोक पवार, प्रभाकर निकम, चंद्रकांत पवार, विनोद खैरनार, पोपट पवार, साहेबराव पवार, प्रकाश खैरनार, नरेंद्र वाघ, सतीश निकम, प्रवीण महाजन, प्रवीण गांगुर्डे, प्रभाकर पवार, समाधान पवार आदी उपस्थित होते.
मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 7:40 PM