नाशिक : निफाड साखर कारखान्याची जमीन ड्रायपोर्टसाठी विक्री करून कारखान्याकडे असलेली जिल्हा बॅँकेची थकबाकी वसूल केल्यानंतर कारखाना सुरू करण्यासाठी पुन्हा बॅँकेकडून कर्जपुरवठा करण्याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी सुरू केलेल्या प्रयत्नावर लासलगाव बाजार समितीचे संचालक व बँकेचे माजी संचालक राजेंद्र डोखळे यांनी सवाल उपस्थित केला आहे. अगोदरच बँक आर्थिक अडचणीत सापडलेली असताना कारखान्याला कर्जपुरवठा कसा करणार? अशी विचारणा त्यांनी केली असून, लोकांच्या भावनेशी न खेळण्याचा सल्ला दिला आहे. या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना डोखळे यांनी म्हटले आहे की, जिल्हा बॅँकेचे थकीत कर्ज जवळपास २९०० कोटी रुपये इतके असून, एनपीए मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आर्थिक शिस्त न पाळल्यामुळे तसेच धोरणबाह्य कर्जपुरवठा केल्यामुळे रिझर्व्ह बॅँकेने सहकार कायद्यान्वये बँक बरखास्त केली व प्रशासन नियुक्त केले होते. त्याविरुद्ध संचालकांनी न्यायालयातून अंतरिम स्थगिती घेतली आहे. कोर्टाने बॅँकेचे कामकाज पुन्हा संचालक मंडळाकडे सोपविले व यापुढे आर्थिक शिस्त पाळली जाईल, धोरणबाह्य कर्ज कोणालाही दिले जाणार नाही, ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करू, असे कोर्टात संचालकांनी सांगितले आहे. वसुलीसाठी बॅँकेकडून जप्ती केली जात असली तरी अजूनही शेतकरी बॅँकेत रोख पैसे भरण्यास तयार नाही. कारण पैसे भरले तरी पुन्हा कर्ज मिळण्याची त्यास खात्री नाही. मागील वर्षी कर्ज भरूनही नवीन कर्ज मिळाले नाही हा अनुभव शेतकरी घेत आहेत. कर्जमाफी मिळेल या अपेक्षेने तसेच नियमित कर्ज भरूनही आपल्याला कर्जमाफी नाही, अशा भावनेतून सरकार शेतकºयांसाठी दिलासादायक काहीच करत नसल्याच्या संतापाच्या भावनेतून शेतकºयांनी कर्ज भरण्याचे थांबविले आहे. बॅँक खातेदाराला दोन हजारांपेक्षा जास्त रक्कम मिळत नाही, एनपीएचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जिल्हा बॅँकेचे चेक वटणे बंद आहे, स्टेट बॅँकेने जिल्हा बॅँकेचे क्लिअरन्स थांबवले आहे, अशा परिस्थितीत निसाकाने स्वत:ची ११० एकर जमीन ड्रायपोर्टसाठी विकून एनडीसी बॅँकेचे १०५ कोटी रुपये भरले तरी जोपर्यंत बॅँकेचा एनपीए कमी होणार नाही आणि भरले तरी बॅँक कर्जवाटप धोरणाच्या बाहेर जाऊन निसाका सुरू करण्यासाठी लागणारे ४० ते ५० कोटी रुपयांचे कर्ज कसे देणार? असा सवालही त्यांनी केला आहे.अनुत्तरित प्रश्नांचे उत्तरे द्याजिल्हा बॅँकेने निसाका व नासाकाला धोरणबाह्य कर्जपुरवठा केल्याचा ठपका रिझर्व्ह बॅँकेने ठेवला आहे. त्यामुळे बॅँकेचे संचालक पुन्हा धोरणबाह्य कर्जपुरवठा करतील काय? की फक्त कारखान्याची जमीन विकून कर्ज भरून घ्यायचे आहे? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. निसाकाची संपूर्ण जागा २६५ एकर आहे. त्यातील ९० एकर कामगार वसाहत, गेस्ट हाऊस, साखर कारखाना व इतर नागरी वापरासाठी आहे. ४० एकर के. के. वाघ शिक्षण संस्थेला देण्यात आली आहे अशी १३० एकर जमीन अडकलेली आहे. त्यातील ११० एकर जमीन ड्रायपोर्टला दिली तर उरलेल्या २५ एकर जमिनीच्या तारणावरून बॅँक ५० कोटी कर्ज कसे देणार? असा सवालही त्यांनी केला आहे. ड्रायपोर्टसाठी एक कोटी रुपये दराने जरी जमीन घेतली तरी कारखान्याकडे उर्वरितांचे देणे कारखाना कसा फेडणार याबाबत सर्व सभासदांना स्पष्टीकरण दिल्यास कारखान्याच्या मदतीसाठी तेही पुढे येतील अन्यथा ‘पोपट मेला आहे’ या गोष्टीतील राजाला सांगावेच लागेल. लोकांच्या भावनेशी कोणीही खेळू नये, असा सल्लाही डोखळे यांनी दिला आहे.
बॅँक निसाकाला कसा कर्जपुरवठा करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:34 AM