संजय पाठक, नाशिक- रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा प्रश्न नवा नाही. हा रोजीरोटीचा भाग असल्याने खरे तर हा सामाजिक प्रश्न आहे. सर्वाेच्च न्यायालयामुळे फेरीवाला धोरण आले, त्यातून अनेक संकल्पना पुढे आल्या परंतु हे सर्व कागदावरच! नाशिकमध्ये अनेक फेरीवाला क्षेत्र ओस पडले आहेत. तर अनेक ठिकाणी अतिक्रमण कायम आहे. महापालिकेने फुल बाजाराला हात घातला असला आणि दररोज कितीही मोहिमा राबवल्या तरी फेरीवाल्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि त्यांच्या सहभागाशिवाय हा प्रश्नच सुटणे अशक्य असल्याचे दिसत आहे.
नाशिक शहरात महापालिकेने फेरीवाला क्षेत्रांची निर्मिती केली आहे. त्याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र त्यासाठी महापालिकेच्या महासभेने घेतलेले निर्णय तसेच शहर फेरीवाला समिती आणि विभागीय फेरीवाला धोरण समितीने केलेले ठराव या विषयी तफावती आहे. अर्थात, फेरीवाल्यांसाठी दिल्या जाणाºया जागा वाहतूकीला अडथळा ठरणार नाही अशा पध्दतीने दिल्या जातात आणि दुसरीकडे रहदारी गर्दी किंवा नागरी वसाहतच नसेल तर व्यवसाय कसा काय होणार हा फेरीवाल्यांचा प्रश्न असतो. या मतभेदातून किमान काही क्षेत्र वगळले तर अन्य भागात तरी ते यशस्वी व्हायला हवेत. परंतु तसे होत नाही. मुळात महापालिकेने अनेक भागात फेरीवाला क्षेत्र चांगल्या पध्दतीने राबविले असले तरी नाशिक गावठाण भागातील प्रश्न सोडवता आलेला नाही.
मेनरोडवरील कटलरी, कापड, बुट चप्पल विक्रेते असो किंवा सराफ बाजारातील फुल बाजार अथवा रविवार कारंजा, बोहोरपट्टी असो प्रश्न सुटला नाही. भद्रकाल भाजी मार्केट सारख्या अतिदाटीच्या भागात तर विचारायलाच नको इतकी गंभीर समस्या आहे. सराफ बाजारातील फुल विक्रेत्यांना केवळ हटवून हा प्रश्न सुटणार नाही तर त्यासाठी पर्यायी सोयीची जागा एकतर दिली पाहिजे अथवा फेरीवाला क्षेत्राप्रमाणे विशिष्ट वेळेत व्यवसायाची परवानगी दिली पाहीजे तरच हा प्रश्न सुटू शकले. आज येथील सराफ व्यवसायिकांचा असलेला विरोध चुुकीचा नाही. कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक करून केवळ अतिक्रमणाच्या मुळे ग्राहक फिरणार नसेल तर तेथे त्यांचा विरोध होणे स्वाभाविक आहे. महापालिकेने आत्ता तर सराफ बाजारालाच हात घातला. मेनरोडला हात घातल्यानंतर तर आणखी आव्हाने उभी राहणार आहेत.समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता केवळ कारवाई करीत राहीली तर प्रश्न सुटणे कठीण आहे. त्यामुळे सर्वसमावेशक तोडगा हवा तसे झाल तर आजचे तिबेटीयन मार्केटजवळील पावभाजी विक्रेत्यांची जागा किंवा अलिकडे कॉलेजरोडला डॉन बॉस्को लगत फेरीवाला क्षेत्रात स्थिरावलेली खाऊ गल्ली अशा प्रकारची यशस्वीता लाभू शकेल. एक दिवस कारवाई आणि दहा दिवस आराम यातून काहीच हाती पडणार नाही.