श्याम बागुलनाशिक : लोकसभा निवडणूक दृष्टिपथात असली तरी ही निवडणूक राज्यात स्वबळावर लढविणार की शिवसेनेला बरोबर घेणार याविषयी खुद्द भाजपाच संभ्रमात असून, त्यातही युती झाली तर दोन्ही पक्षांना पूरकच ठरेल, अशी भावना विद्यमान खासदारांबरोबरच आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवणाऱ्या इच्छुकांचीदेखील आहे. असे असताना भारतीय जनता पक्षाने नुकतेच नाशिक येथे नाशिक व नगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांचे संमेलन घेऊन त्यांच्या शिडात हवा भरण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु या संमेलनाकडे विद्यमान खासदाराबरोबरच आमदार व मार्गदर्शकांनी पाठ फिरविल्याने पक्षाचे शक्ती केंद्र म्हणून घेणा-या कार्यकर्त्यांचा शक्तीपातच झालेला दिसला. सत्ताधारी पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीपूर्वी अशा प्रकारची उदासीनता असेल तर निवडणुकीत कमळ कसे फुलेल?
नाशिक विभागातील नाशिक व नगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघापैकी दोन मतदार संघ शिवसेनेकडे व दोन भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे नाशिक मुक्कामी भाजपाने त्यांच्या शक्ती केंद्र प्रमुखाचे संमेलन नाशिकमध्ये घेणे यामागे दुहेरी अर्थ प्रतिध्वनीत होतो. मुळात शिवसेनेकडून त्यांचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याविषयी साशंकता आहे, त्यामागे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा पूर्वेतिहासाचे कारण दिले जाते. एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही व त्यातही त्याच पक्षाकडून त्याला उमेदवारी मिळाली तरी, त्याला यश मिळत नाही या वास्तवासी शिवसेना अवगत आहे, अशातच मध्यंतरीच्या काळात गोडसे यांचे स्थानिक नेतृत्वाशी बिघडलेले संबंध पाहता, शिवसेना नवीन चेह-याच्या शोधात असलेल्या होणा-या पक्षांतर्गत चर्चाशी स्वत: गोडसे अवगत आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आदी मंडळींशी साधलेली जवळीकता बरेच काही सांगून गेली आहे. त्यामुळे निवडणूक युती झालीच नाही तर गोडसे भाजपाचे उमेदवार असणार नाही, अशी खात्री कोणी देऊ शकणार नाही. त्यामुळेच भाजपाच्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या नाशिक संमेलनाला अधिक महत्त्व आहे. असे असले तरी, नाशिक लोकसभा मतदारसंघातील कार्यरत शक्ती केंद्र प्रमुखांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याइतकी असल्याचा अनुभव आयोजकांनी घेत नाराजी व्यक्त केली. शिर्डीची जागादेखील शिवसेनेची आहे. सदाशिव लोखंडे खासदार असून, या जागेसाठीही तयारी करून भाजपा सेनेवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार दिलीप गांधी हे आवर्जून या संमेलनाला हजर होते, त्यांच्या मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुख ख-या तयारीनेच आल्याचे जाणवल्याशिवाय राहिले नाही, त्या मानाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे स्वत:च या संमेलनाला गैरहजर राहिल्याने त्यांची निवडणुकीविषयीची गांभीर्यता दिसून आली. परंतु त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची शक्तीदेखील कोठे दिसली नाही. या संमेलनाचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रमुख मार्गदर्शक राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीला सामोरे कसे जावे याविषयी मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना त्यांनी राजकीय भाषण करून आटोपते घेतले, त्यांनी व्यासपीठ सोडताच व्यासपीठावरील पदाधिका-यांनीही सोयीस्कर काढता पाय घेतला. या संमेलनासाठी राम शिंदे यांनी नावापुरती हजेरी लावली तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सपशेल पाठ फिरविली. शक्ती केंद्र प्रमुख म्हणून आलेल्यांनी भोजनाचा आस्वाद व आपल्या भागातील मतदार याद्या घेऊन अवघ्या तीन तासांत दिवसभरासाठी आयोजित संमेलन पार पडले. ‘अब की बार फिर मोदी सरकार’ अशी घोषणा पक्ष एकीकडे देत असताना वास्तवात नेते, कार्यकर्त्यांमध्ये असे नैराश्य असेल तर पुन्हा कमळ कसे फुलणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.