नाशिक : शहराचा पारा अचानकपणे घसरला असून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना सोमवारी (दि.२७) रात्रीपासून हुडहुडी भरली आहे. मंगळवारी पहाटेदेखील कडाक्याची थंडी नाशिकरांनी अनुभवली. ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.आठवडाभरापासून थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा रविवारी १३ अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे संध्याकाळी व पहाटे हवेत गारवा निर्माण झाला होता. थंडीची तीव्रताही सोमवारी रात्रीपासून अचानकपणे वाढली. मंगळवारी ११.२ इतके नीचांकी तपमान या हंगामातील नोंदविले गेले.पंधरवड्यापूर्वी ११.८ अंशांपर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर पुन्हा किमान तपमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती. आठवडाभरापूर्वी किमान तपमानाचा पारा १९ अंशांपर्यंत वर सरकल्याने नाशिककरांचे पंखे दिवसा-रात्री वेगाने फिरू लागले होते. वातानुकूलित यंत्रांचाही वापर नागरिकांकडून केला जाऊ लागला होता. कारण उष्मा जाणवत होता; मात्र पुन्हा किमान तपमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती बदलली.काही खासगी शाळांची सुटी संपल्यामुळे सकाळी चिमुकल्यांना शाळेत सोडताना पालकांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, टोपी, मफलर, जॅकेटचा वापर केला जात आहे. लहानगेही संपूर्णत: ‘पॅक’ होऊन शाळेत जाताना दिसून येत आहे. दूधविक्रेते, वर्तमानपत्र विक्रेत्यांसह ज्यूसविक्रेत्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे संध्याकाळी बाजारपेठांमध्ये लवकर शुकशुकाट दिसू लागला आहे.किमान तपमानाचा पारा जरी घसरत असला तरीदेखील कमाल तपमानाचा पारा अजूनही तिशीपारच असल्यामुळे सूर्योदयानंतर थंडीचा प्रभाव कमी होत असून सकाळी ८ वाजेनंतर थंडीची तीव्रता सुंपष्टात येत आहे.
नाशिककरांना भरली हुडहुडी ; पारा घसरला : ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 1:22 AM