इंदिरानगर : वडाळागावातील अण्णा भाऊ साठेनगरच्या शेवटच्या टोकाला अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळात असलेल्या एका प्लॅस्टिक भंगारमालाच्या अनधिकृत गुदामाला सोमवारी (दि.३०) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच मुख्यालयासह पाच उपकेंद्रांवरील प्रत्येकी एक मेगा बाऊजर बंबासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. शेकडोंच्या संख्येने उसळलेल्या बघ्यांच्या गर्दीचा सामना करत जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तासाभरात आग आटोक्यात आणल्याने रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.
याबाबत अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी, रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयात युसुफ खान नावाच्या व्यक्तीने मोबाइलवरून या भीषण आगीच्या घटनेची माहिती कळविली. यानंतर तत्काळ पुढील पाच मिनिटांत सिडको उपकेंद्रावरील बंबासह जवान घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या मदतीसाठी शिंगाडा तलाव येथील मेगा बाऊजरसह जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातील या दोन्ही बंबांवरील दहा जवानांनी मिळून शर्थीचे प्रयत्न करत आग विझविण्यास सुरुवात केली. आगीच्या ज्वाला आकाशात धुमसत असल्यामुळे आणि अतिरिक्त मदतीची मागणी होऊ लागल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिकरोड, सातपूर, पंचवटी, कोणार्कनगर विभागीय कार्यालय, अंबड एमआयडीसीचे प्रत्येकी एक असे पाच बंब एकापाठोपाठ तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे या भीषण आगीचे तांडव शमविण्यास जवानांना यश आले. युसूफ तर्रार यांच्या मालकीचे भंगारमालाचे गुदाम या आगीत भस्मसात झाले. आगीचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते. या परिसरात अत्यंत दाट लोकवस्ती व लाकडी फळ्या, पत्रे असलेली झोपडीवजा घरे तसेच गुदामांची संख्या अधिक असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र अग्निशमन दलाने दाखविलेले प्रसंगावधान आणि युद्धपातळीवर केलेल्या अथक परिश्रमामुळे मोठा अनर्थ टळला आणि रहिवाशांची घरे सुरक्षित राहण्यास मदत झाली.
मदतकार्यात अडथळ्यांची शर्यत
अग्निशमन दलाच्या बंबांना घटनास्थळी पोहचताना श्री.श्री.रविशंकर मार्गापासून सुमारे दीड किलोमीटरच्या चाळण झालेल्या रस्त्यावरुन मार्ग काढावा लागला. घटनास्थळी जमलेल्या बघ्यांच्या मोठ्या गर्दीचा सामना करत जवानांनी आपले कर्तव्य पार पाडले. या रस्त्याची मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरुस्ती प्रतीक्षेत आहे. तसेच या भागा अरुंद गल्लीबोळ असल्यामुळे आपत्कालीन कार्यास अडथळे आले.