नाशिक : पश्चिम वनविभागाच्या अखत्यारितीतील राखीव वनक्षेत्र असलेल्या फाशीच्या डोंगराच्या पश्चिमेला पायथ्यालगत एका झाडावर कापडाच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मानवी मुंडके लटकलेल्या अवस्थेत रविवारी (दि.२) ‘देवराई’वर श्रमदान करणाऱ्या स्वयंसेवकांना आढळून आले. त्यांनी याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना कळविली. तत्काळ घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत पंचनामा करत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची अकस्मात नोंद के ली.याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजीनगरजवळील फाशीच्या डोंगरावर एका झाडाला कापडाने गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी तरूणाचे मुंडके लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. सातपूरजवळील शिवाजीनगरचा जलनगरीपर्यंतचा भाग गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट आहे. वीके ण्डला डोंगराच्या पायथ्याशी राखीव वनात लावलेल्या हजारो वृक्षांच्या संवर्धनाकरिता श्रमदानासाठी विविध भागातील निसर्गप्रेमी स्वयंसेवक हजेरी लावतात. रविवारी नेहमीप्रमाणे काही स्वयंसेवक या भागात श्रमदान करत असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यावेळी जागरूक नागरिकांनी तत्काळ गंगापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी, पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांच्यासह पथकाने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. अनोळखी मृतदेहाचा पंचनामा करत पोलिसांनी नोंद केली. अंदाजे ३० ते ४० वयोगटातील पुरूषाचा मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नोंदींच्याआधारे या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहामागे घातपात की आत्महत्त्या याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रथमदर्शी आत्महत्त्या असल्याचा संशय वर्तविण्यात आला आहे.