डांगसौदाणे : गेल्या २८ दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या विद्युतपंपाचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केल्याने सोमवारी बुंधाटे (ता. बागलाण) येथील महिलांनी आक्रमक होत येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढून अधिकाºयांना घेराव घालत निवेदन दिले. डांगसौदाणे व बुंधाटे ग्रामपंचायतींना सार्वजनीक पाणीपुरवठा करणारी विहीर व विद्युतपंप एक असल्याने या दोघा ग्रामपंचायतींनी सुमारे १४ लाख रुपये वीजबिल थकविले आहे. त्यामुळे वितरण कंपनीने या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाºया विहिरीचा विद्युतपुरवठा २८ दिवसांपासून खंडित केलेला आहे. थकीत विजबिल भरण्यासाठी दोघा ग्रामपंचायत प्रशासनात एकमत होत नसल्याने जनतेचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्या मालकीची आणखी एक पाणीपुरवठा करणारी विहीर असल्यामुळे त्यांनी पहिल्या पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे बील भरण्यासाठी नकार दिल्याने बुंधाटेवासीयांची मोठी अडचण झाली आहे. महिलांनी थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर आपला मोर्चा वळविला. जोपर्यंत विद्युतपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा महिलांनी निर्णय घेतला. ग्रामपंचायत कार्यालयाला जसे टाळे ठोकले तसे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू, अशी भूमीका या महिलांनी घेतली. विजबिल डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्या नावाने असल्याने ते त्यांनी भरावे, असे बुंधाटे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बुंधाटे ग्रामपंचायत प्रशासनाला एकट्याने एवढी थकबाकी भरणे शक्य नसल्याने गेल्या २८ दिवसांपासून बुंधाटे गावाचा पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे आक्र मक झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त करीत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
बुंधाटेच्या महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:37 AM