नायगाव : सध्या बाजारात सर्वच भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री होत आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हातात येत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. महागडा खर्च करून पिकवलेला माल बाजारात फेकण्याऐवजी शेतातच सडवण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरू केला आहे. सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात शेकडो एकर कोबी व टमाट्याच्या पिकावर बळीराजाने रोटर फिरवला आहे.
सध्या बाजारात कोबीला कवडीमोल दर मिळत असल्यामुळे या पिकाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना कोणी कोबी घेत का? कोबी? अशी भावनिक साद घालण्याची वेळ कृषी प्रधान देशातील बळीराजावर आली आहे. सध्या सर्वच भाजीपाल्याला मातीमोल दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चावर शासन नियमाप्रमाणे दीडपट हमीभाव तर सोडाच विक्री केलेल्या मालातून उत्पादन खर्चाच्या तीनपट कमी पैसे हातात पडत असल्यामुळे शेतीसह शेतकरी कुटुंबावर सध्या नैराश्याची छाया पसरली आहे.
सिन्नर तालुक्यातील शेतकरी खरिपाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात कोबी, फ्लाॅवर, टमाटे, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, मेथी आदींसह वेलवर्गीय पिके घेत असतात. यंदा पावसाचे प्रमाणही अत्यल्प राहिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या जिगरीवर हे पिके घेतली. या पिकांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीत महागडी औषधे, खते व कीटकनाशकांच्या फवारणी करून हे पिके जगवली आहे. अशा या पिकांना गेल्या महिनाभरापासून बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चाएवढेही पैसे येत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
------------------------
कोणी कोबी घेता...का कोबी?
कोबी पिकाचे तर मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. हे पीक गेल्या काही दिवसांपासून विविध रोगांना बळी पडत आहे. अशा परिस्थितीतून हे पीक घेणे अवघड झाले आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या बियाण्यांच्या, खते, औषधे व कीटकनाशकांचे भाव लक्षात घेता सध्या एक एकर कोबी पिकावर शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च येतो. मात्र, याच पिकाला सध्या बाजारात जास्तीत जास्त एक रुपया किलो भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना तर अक्षरशः व्यापाऱ्यांच्या मागे फिरवून कोणी कोबी घेता...का कोबी? अशी आरोळी मारत फिरण्याची वेळ आली आहे.
-----------------------------
उत्पादन खर्चाचा बोजा निघेना
सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राम्हणवाडे, सोनगिरी, जोगलटेंभी व मोह आदी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून शेकडो एकर क्षेत्रातील कोबी, टमाटे व कोथिंबीर या पिकांवर नांगर फिरवला आहे. या पिकांवर झालेला उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या माथी लाखो रुपयांचा बोजा मात्र चढला आहे.
------------------
मी दोन एकर क्षेत्रात कोबीचे पीक घेतले होते. या पिकाला काढणीपर्यंत खते, औषधे, कीटकनाशके, मजुरी व बियाणे असा सर्व दीड लाख रुपये खर्च आला होता. मात्र, विक्रीच्या वेळेत भाजारभाव अत्यल्प झाल्याने या कोबी पिकास घेण्यासही कोणीच धजावले नाही. अशा परिस्थितीत मार्केटला जाण्याचा खर्चही फिटत नसल्याने मी या सर्व क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवले. उत्पादन खर्चही हाती न पडल्याने पुढील पिकाची तयारी कशी करावी हाच प्रश्न सतावत आहे. - रमेश आव्हाड, शेतकरी, जायगाव
----------------
फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे कोबी पिकावर रोटाव्हेटर फिरवताना शेतकरी . (०९ नायगाव)
090921\09nsk_14_09092021_13.jpg
०९नायगाव