नाशिक- दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ रविवारी मुंबईत केल्या जाणाऱ्या आंदोलनासाठी उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी मुंबईकडे शनिवारी (दि.२३) वाहनांव्दारे कुच केले.
केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकरी विरोधी तसेच कार्पोरेट कंपन्यांचे धार्जिणे असल्याचा आरोप करीत हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सध्या आंदोलन सुरू आहे. त्याच्या समर्थनार्थ रविवारी (दि.२४) राज्यातील शेतकरी आंदोलक आझाद मैदानावर धडकणार आहेत. व नंतर राज्यपाल भवनावर धडकणार आहेत. २३ ते २६ जानेवारी दरम्यान देशभरात अशाप्रकारचे आंदोलन करण्यात येणार आहेत. राज्यातील आंदोलनासाठी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातून शेकडो शेतकरी आंदोलक दुपारी नाशिकमध्ये जमा झाले आहेत.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने होणाऱ्या आंदोलनासाठी शेतकरी गेाल्फ क्लब मैदान येथे जमा झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विविध गीते सादर करून आंदेालकांत जोश निर्माण करणाऱ्या आणि किसान सभेचे ध्वज हाती घेतलेल्या या शेतकऱ्यांबरोबरच विद्यार्थी संघटना देखील सहभागी झाल्या आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलन संघर्ष समिती, नेशन फॉर फॉमर्स , हम भारत के लाेक अशा पाच संघटनांनी एकत्र येऊन या आंदेालनासाठी विविध शंभर हून अधिक संघटनांची मोट बांधली आहे.