नाशिक : शहरातील नामांकित गोखले एज्युकेशन संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून दिंडोरी रोडवरील एका विवाहितेने अनेकांची अकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ रसिका महेश मुळे-गायधनी असे या संशयित विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे, याच संस्थेत विविध पदांवर नोकरी लावून देण्याच्या आमिषाने आतापर्यंत अनेकांची फसवणूक केल्याच्या घटना घडलेल्या आहेत़
गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव मोरेश्वर सदाशिव गोसावी (वय ८२, रा. अनुबंध बंगला, मॉडेल कॉलनी, कॉलेज रोड, नाशिक) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रसिका महेश मुळे-गायधनी (२७, रा. २-३५, हाउसिंग बोर्ड कॉलनी, मायको दवाखान्याजवळ, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक) या महिलेने २४ मे २०१७ ते १० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत गोखले एज्युकेशन सोसायटीची (संस्था) खोेटी व बनावट कागदपत्रे, तसेच शिक्के तयार केले. या बनावट कागदपत्रे व शिक्क्यांच्या साहाय्याने संस्थेच्या पदाधिकाºयांच्या बनावट सह्या केल्या.
संशयित गायधनी हिने शहरातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांचा विश्वास संपादन करून गोखले एज्युकेशन संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. या पद्धतीनुसार रसिका गायधनी हिने श्री. व सौ. गुरव (रा. उपनगर, नाशिक) यांच्याकडून नोकरीच्या आमिषाने ११ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. संशयित रसिका मुळे हिने आतापर्यंत गोखले एज्युकेशन संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली असून, लाखो रुपये उकळले आहेत़ त्यापैकी गंगापूर पोलिसांनी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे़