नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी उमेदवारी अर्जांनी शंभरी पार केली. आतापर्यंत १११ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आता अखेरचे दोन दिवस उरले असून, राजकीय पक्षांकडून रात्री उशिरापर्यंत उमेदवारांच्या याद्या घोषित न झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. महापालिका निवडणुकीसाठी गेल्या पाच दिवसांत ४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आॅनलाइन प्रणालीद्वारे अर्ज दाखल करण्याची किचकट प्रक्रिया आणि राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर होण्यास लागलेला विलंब यामुळे गेल्या पाच दिवसांत सहाही विभागातील निवडणूक कार्यालयांमध्ये फारशी वर्दळ नव्हती. बुधवारी (दि. १) राजकीय पक्षांकडून याद्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु एकाही पक्षाने दिवसभरात आपले पत्ते खुले केले नाहीत. मात्र, काही आजी-माजी नगरसेवकांनी पक्षादेशाची प्रतीक्षा न करता आपले उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले आहेत. बुधवारी एकूण ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले. (प्रतिनिधी)
उमेदवारी अर्जांची शंभरी पार
By admin | Published: February 02, 2017 1:52 AM