नाशिक : अहमदनगरच्या निंबोडी गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थी दगावल्याची घटना ताजी असतानाच, नाशिक जिल्हा परिषदेच्याही दीडशेहून अधिक प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पडून आहेत. त्यात शिकणाºया शेकडो विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहेत. त्यातील मंजूर असलेल्या सुमारे ७२ शाळांच्या तपासणीसाठी कार्यकारी अभियंत्यांची एक समिती नियुक्त करण्यात आल्याने पावसाळा संपत आला तरी अद्याप या शाळाखोल्यांच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला नाही.दरम्यान, ओझर येथील जिल्हा परिषदेच्या मुले-१ व मुले-२ या दोन शाळांच्या अकरा खोल्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी साडेपाच लाखांचा निधी डिसेंबर २०१६ पासून मंजूर असतानाही अद्याप या पडक्या शाळांच्या खोल्या दुरुस्त करण्यास जिल्हा परिषदेला मुहूर्त सापडलेला नाही. तूर्तास या ११ शाळांमध्ये रात्री मद्यपी युवकांचा सुळसुळाट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे दोनशेहून अधिक प्राथमिक शाळांमधील खोल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सादर केले होते. त्यातील ७२ शाळा खोल्यांच्या प्रस्तावांना मान्यता देऊन निधीही मंजूर करण्यात आला आहे. ओझर जिल्हा परिषदेच्या मुले-१ व मुले-२ शाळेतील सुमारे ४४० विद्यार्थी शिकत असलेल्या ११ शाळा खोल्यांना प्रत्येकी साडेपाच लाख रुपयांप्रमाणे निधीही डिसेंबर २०१६ मध्ये दुरस्तीसाठी मंजूर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अद्याप या ११ शाळा खोल्यांच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला नाही. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शीतल प्रकाश कडाळे यांनी मार्च २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहात जमिनीवर बसून या शाळा खोल्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले होते. आता निवडून आलेले अपक्ष जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम यांनीही शाळा दुरुस्तीच्या मुद्द्याला प्रचाराच्या जाहीरनाम्यात स्थान दिले होते. मात्र अद्यापपर्यंत या शाळा खोल्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्णातील मंजूर असलेल्या मात्र दुरुस्त न झालेल्या ७२ शाळा खोल्या तसेच सुमारे दीडशेहून अधिक शाळा खोल्यांची अवस्था जर्जर झाली आहे. या शाळांमधील विद्यार्थी जीव मुठीत धरून शाळेत बसत असल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे.
जिल्ह्यातील दीडशे शाळा धोकादायक स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:11 AM