नाशिक : मूल्यांकन, प्राप्त घोषित व अघोषित कनिष्ठ महाविद्यालये व शाळांना अनुदानाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी (दि.१७) नाशिक जिल्ह्यातून शेकडो शिक्षक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०१८-१९च्या संचमान्यतेनुसार शिक्षक संख्या कायम ठेवण्याची, मूल्यांकन प्राप्त घोषित व अघोषित शाळा व कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्यांना अनुदान मिळावे आदी विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलक शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक शहर व जिल्हाभरातून विविध शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शेकडो शिक्षक मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत. त्यासाठी गंगापूररोड परिसरातील केटीएचएम महाविद्यालयासमोरून व सिडकोतील महाविद्यालयासमोरून पहाटे सहा वाजता बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खासगी वाहनांनीही शहर व जिल्ह्यातील शिक्षक मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यााठी रवाना होणार आहेत.
नाशकातील शेकडो शिक्षकांची आज मुंबईकडे कूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:20 AM