नाशिक : आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा पंधरवडा म्हणून ओळखल्या जाणाºया पितृपक्षामध्ये पितरांचा एक घास वंचितांसाठी देण्यासाठी शेकडो हात शनिवारी (दि.१६) सरसावले. यावेळी अवघ्या सहा तासांत बारा क्विंटल धान्यासह ऐंशी हजारांच्या रकमेचे नाशिककरांनी दान केले.निमित्त होते, गंगापूररोडवरील ‘नसती उठाठेव मित्र परिवार’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘पितरांचा महोत्सव’चे. मागील आठ वर्षांपासून अखंडितपणे हा उपक्रम सदर संस्था राबवित आहे. केवळ शहर व जिल्ह्यापुरताच हा आगळावेगळा असा ‘पितरांचा महोत्सव’ मर्यादित न राहता अवघ्या राज्यभर पोहचला आहे. राज्यातील इतर शहरांमधूनही नागरिकांकडून या उपक्रमाला प्रतिसाद मिळतो. नागरिक ऐच्छिक स्वरूपात आपल्या पूर्वजांच्या नावाने काही रक्कम दान करत संबंधित संस्थेच्या बॅँक खात्यात जमादेखील करत असल्याची माहिती अध्यक्ष बापू कोतवाल यांनी दिली. संस्थेच्या यंदाचे नववे वर्ष होते. या कार्यक्रमादरम्यान सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गंगापूररोडवरील नसती उठाठेव मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांकडे धान्य, डाळी, तेलाच्या पिशव्या, गुळाची भेळी, रवा दान केले. तसेच काही नागरिकांनी रोख स्वरूपात रक्कमही दिली. दरम्यान, अवघ्या पाच ते सहा तासांत बारा क्विंटल धान्यासह ऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम यावेळी जमा झाली. दरम्यान, पुरोहितांनी यावेळी वेदांमधील मंत्रांचे पठण करत पूर्वजांचे स्मरण केले. संस्थेच्या वतीने शहरातील वृद्ध, अंध-अपंग, अनाथ, गतिमंद या घटकांचे पुनर्वसन करणाºया संस्थांना जमा झालेले धान्य व रोकडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या धान्याचा पुरवठा केला जातो, असे कोतवाल यांनी सांगितले.
पितरांचा एक घास वंचितांना देण्यासाठी शेकडो हात सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 7:59 PM
पितृपक्षामध्ये पितरांचा एक घास वंचितांसाठी देण्यासाठी शेकडो हात शनिवारी (दि.१६) सरसावले.
ठळक मुद्देधान्य, डाळी, तेलाच्या पिशव्या, गुळाची भेळी, रवा दान राज्यातील इतर शहरांमधूनही नागरिकांकडून या उपक्रमाला प्रतिसादसहा तासांत बारा क्विंटल धान्यासह ऐंशी हजारांच्या रकमेचे नाशिककरांनी दान केले.