सिन्नर : तालुक्यातील निऱ्हाळे येथे श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय यात्रोत्सवास हजारो भाविकांनी हजेरी लावली. हत्तीवरून काढण्यात आलेल्या पालखी मिरवणूक सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या प्रारंभाला दोन दिवस श्री क्षेत्र बुवाजी बाबांचा यात्रोत्सव भरतो. निऱ्हाळे येथे सुरुवातीला बुवाजी बाबांच्या केवळ पादुकावजा मंदिर होते. सन २००४ साली मंदिराचे पुजारी महंत बबनराव सांगळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भव्य बुवाजी बाबांचे मंदिर साकारले आहे. तेव्हापासून या यात्रोत्सवाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प. पू. बुवाजी अहिलाजी पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता बुवाजी बाबा यांच्या पालखीची गजराजावरून मिरवणूक काढण्यात आली. यात्रोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी सकाळी १० वाजता ह.भ.प. रामायणाचार्य अरुण गिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. त्यानंतर महाप्रसाद व देवाचा कार्यक्रम झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, सुनील बागूल, उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समिती सदस्य शोभा बर्के, रोहिणी कांगणे, जगन्नाथ भाबड, नगरसेवक मच्छिंद्र सानप, रणजीत देशमुख, सोमनाथ पानगव्हाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
निऱ्हाळे येथे हजारो भाविकांची मांदियाळी
By admin | Published: March 04, 2017 12:43 AM