लासलगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाशी मार्केटप्रमाणेच येथील कांदा आणि धान्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी समिती पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.कोरोनामुळे एकूणच अर्थकारणावर परिणाम झाला आहे. गुरुवारपासून (दि.२६) मजुराअभावी व्यापारीवर्गाने कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा व धान्याचे लिलाव बंद पडले आहेत. परिणामी कांद्यासारखा नाशवंत माल बाहेर जाणे थांबले आहे.अशा स्थितीत बाजार समितीचे लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे मोठे आव्हान बाजार समितीपुढे उभे ठाकले आहे. वास्तविक यापूर्वी खरेदी केलेला कांदा आजही व्यापारीवर्गाच्या कांदा खळ्यावर पडून आहे. लासलगाव येथील लिलाव बंद असले तरी विंचूर येथील लिलाव सकाळच्या सत्रात सुरू आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झालेली आहे. मात्र, शहरी भागात तसेच मुंबई-पुणे या दोन मोठ्या शहरात अन्नधान्याचा पुरवठा तसेच दूध-भाजीपाल्याचे वितरण होणे आवश्यक बनले आहे. लासलगाव येथील व्यापारीवर्गाच्या कांदा मालट्रकला परराज्यात विशेषत: उत्तर प्रदेशात व मध्य प्रदेशात रोखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तेथून माल पाठविलेल्या ठिकाणी कांदा मालट्रक पाठविणेकरिता बाजात समितीकडून पत्र तसेच विविध ना हरकत पत्र पाठविण्याचे काम केले जात आहे.कोरोनाची दहशत वाढलेली असतानाच बुधवारी (दि.२५) अवकाळी पावसाने दणका दिला. काही कांदा उत्पादकांच्या शेतात काढलेला कांदा पोळ करून पडून आहे. अशा अवस्थेत उन्हाळा कांदा सोडला तर लाल कांदा विक्र ी होणे अत्यंत गरजेचे आहे. कांदा वेळेवर नागरिकांना गेला नाही तर कृत्रिम टंचाई व भाववाढीचे कारणाने परत कांदा महागला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.लिलाव प्रक्रियेबाबत अनिश्चिततालासलगाव येथील कांदा बाजारपेठेत बाराशे ते चौदाशे वाहने कांदा व शेतमाल विक्र ीकरिता घेऊन येतात. प्रत्येकी दोन या प्रमाणे अडीच हजार लोक बाजारपेठेत दररोज असतात. या शिवाय खरेदीदार व्यापारी, अडते, व्यापारी गुमास्ते (मदतनीस), बाजार समितीचे शेतमालाचे लिलाव व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारे कर्मचारी असे किमान तीन हजार लोक या प्रक्रि येला लागतात तर कांदा अगर शेतमाल खरेदीनंतर वजनमापास मापारी, हमाल व त्यानंतर त्याची प्रतवारी करण्यासाठी महिला मजूर लागतात. तसेच मालट्रक अगर कंटेनरने माल रवाना करण्यासाठी हमाल लागतात अशा पद्धतीने लासलगावचे बाजार समितीत कांदा अगर शेतमाल खरेदी नंतर सुरळीत रवाना होतो. मात्र सध्या परिस्थिती परस्परांच्या विरुद्ध आहे. संचारबंदी लागू झाल्याने एवढी सारी यंत्रणा एकाच ठिकाणी एकवटणार काय, याबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेबाबत अनिश्चितता आहे.लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे आणि धान्याचे लिलाव पूर्ववत कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कांदा नाशवंत असल्याने त्याची तातडीने विक्री होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांशी संपर्क, चर्चा चालू आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती
कांद्याचा पुन्हा वांधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 8:58 PM
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देकोरोनामुळे लिलाव बंद : तुटवड्यामुळे भाव भडकण्याची भीती