संदीप झिरवाळ । लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी, तसेच सातबारा कोरा करावा, यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील जवळपास अडीच हजाराहून अधिक हमालांची आर्थिक कोंडी निर्माण झाल्याने हमाल संप मिटण्याची प्रतीक्षा करीत आहेत. सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे बाजार समितीत हमाली करून उदरनिर्वाह करणाऱ्या हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास अडीच हजाराहून अधिक हमाल हमाली व्यवसाय करतात. शेतकरी संपामुळे या हमालांवर सध्या तरी घरी बसण्याची वेळ आली आहे. संपामुळे हमाली काम नसल्याने बाजार समितीतील आडत कंपनी तसेच व्यापाऱ्यांकडून दैनंदिन मिळणारी हमाली कामाचा चारशे ते पाचशे रुपये रोजगार बुडत आहे. बाजार समितीत शेतमाल खाली करणारे, जुडी लावणारे, शेतमालाची वाहने भरणारे, शेतमालाची पॅकिंग करणारे तसेच कॅरेट वाहणाऱ्या हमालांची संख्या अडीच हजारापेक्षा जास्त आहे. हमाली व्यवसाय करणाऱ्यात तरुण, युवक तसेच महिला वर्गाचाही समावेश आहे. तीन दिवसांपासून हमाली काम नसल्याने हमालांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. हमाली व्यवसाय बंद असल्याने व कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे या व्यवसायावरच अवलंबून असणाऱ्या हमालांना रोजच्या मीठ, मिरचीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर लवकरच तोडगा काढला तर हमालांना रोजगार मिळेल, याचीच प्रतीक्षा सध्या हमाल करत आहेत.
अडीच हजार हमालांची उपासमार
By admin | Published: June 04, 2017 2:33 AM