येवला : तालुक्यातील रेंडाळे येथे नगरसूल रस्त्यावर पिरबाबाच्या मंदिराजवळ पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाची कुत्र्यांनी लचके तोडून शिकार केली असून हा प्रकार रेंडाळे येथील अमोल अहेर या शालेय विद्यार्थ्याच्या निदर्शनास आज सकाळी आला. दिवसेंदिवस कुत्र्यांकडून हरणाची शिकार होण्याचे प्रकार वाढू लागले आहे. सध्या परिसरात भीषण पाणी टंचाई असल्याने पाण्याच्या शोधार्थ हरणाचे कळप मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहे. त्यातच तालुक्याच्या उत्तर- पुर्व भागात सततचा दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाई पाचवीलाच पुजलेली असते. या भागात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरने पाणी पुरवले जाते. अशात वन्यजिवांना पाणी मिळणे दुरापास्त होते. या भागात हरीण आणि मोर हे जास्त प्रमाणात आढळतात. उन्हाळ्याच्या शेवटच्या काही दिवसात बऱ्याच मुक्या वन्य प्राण्यांना पाण्या अभावी प्राण गमवावे लागतात. लचके तोडलेले हरिण पिरबाबाच्या मंदिराजवळ दिसल्यानंतर ग्रामस्थांनी हा प्रकार वन्यजीव संरक्षक समिती सदस्य प्रविण आहेर यांना कळविले. आहेर यांनी ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारी, वनपाल अशोक काळे, वनसंरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, अजुनही घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिलेली नाही. मृत हरिणाचे कुत्र्यांनी पुन्हा लचके तोडल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. रेंडाळे हे ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात येते. मात्र, वन्यजिवांच्या सुरक्षेची हमी देण्यास वनखाते टाळाळ करते. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
रेंडाळे येथे हरणाची कुत्र्यांकडून शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 2:24 PM