नाशिक : इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढलेले प्रमाण व तुलनेत विद्यार्थी मिळणे कठीण झाल्याने खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांकडूनही विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शाळांनी उन्हाळी सुट्यांमध्ये शिक्षकांवर विद्यार्थी शोधण्याची कामगिरी सोपविली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे प्रवेश न मिळालेल्या शाळांमधील शिक्षकांकडून अजूनही विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे.विविध इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षात नोकरी टिकवायची असेल, तर निश्चित करून दिलेल्या किमान विद्यार्थ्यांचा प्रवेश करून घ्यावा लागणार असल्याने शिक्षकांमध्ये शाळेसाठी प्रवेश मिळविण्यासाठी चुरस दिसून येत आहे. शिक्षण शास्त्रातील पदविका व पदवी (डी.एड., बी.एड.) झाल्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी मिळालेली अल्प वेतनाची अथवा मानधनाची नोकरी टिकविण्यासाठी शालेय शिक्षकांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागत आहे. नोकरीच्या भीतीने शहरासह ग्रामीण भागातील खासगी शाळांच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागते आहे. विशेष म्हणजे खासगी शाळा या पूर्णपणे विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कावर सुरू असल्याने शिक्षकांचे वेतन अथवा मानधनही यातूनच मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांची शोधाशोध करून शाळांमध्ये प्रवेश मिळविणे ही शिक्षकांची अपरिहार्यता झाली आहे. यात ग्रामीण भागात या शिक्षकांना काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी शहरात शाळांची संख्या अधिक असल्याने अनेक पर्याय तसेच बहुतांश शाळांचे शुल्क पालकांना झेपणारे नसल्याने शिक्षकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. ग्रामीण भागात एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या दिवसेंदिवस घसरत चालली आहे. तर दुसरीकडे या खासगी शाळांमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे.विद्यार्थ्यांचा तुटवडामागील दहा-पंधरा वर्षांपासून डी.एड.ची पदवी घेणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये भरतीच्या जागा अगदी शेकडोच्या घरात असल्याने पदवी घेतलेले हे लाखो शिक्षक नाइलाजाने खासगी शाळांमध्ये नोकरी करतात, तर दुसरीकडे गल्लीबोळात खासगी शाळांचे पेव फुटल्याने विद्यार्थ्यांची विभागणी होत आहे. विद्यार्थींची पटसंख्या टिकवण्यासाठी शाळांमध्ये चढाओढ सुरू आहे.
खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:51 PM