ध्रुवनगर भागातील एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मजुरी करत तेथील खोलीत राहणाऱ्या मूळच्या नेपाळ येथील एका दाम्पत्यामध्ये वारंवार खटके उडत होते. आरोपी समशेर याने त्याची पत्नी आयशासोबत जोरदार भांडण करत तिच्या अंगावर १२ जून २०१८ साली ज्वलनशील पदार्थ ओतून जिवंत पेटवून दिले होते. या घटनेत आयशा गंभीररित्या भाजल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी तिचा पती समशेर यास अटक करत त्याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी करत त्याच्याविरुध्द सबळ पुरावे जमा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्याचा खटला वाघवसे यांच्या न्यायालयात सुरु होता. शनिवारी या खटल्यावर अंतिम सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी सबळ साक्ष, पुरावे सादर केले. या पुराव्यांनुसार समशेर याने पत्नीला जिवंत जाळून ठार मारल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी धरले. त्यास जन्मठेप व १ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:15 AM