नाशिक : विवाहितेकडे माहेरच्यांकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावत पतीसह सासरच्या इतर लोकांनी मारहाण व शिवीगाळ करत छळ केला. तसेच पीडित विवाहितेच्या वडिलांनी लग्नात दिलेल्या संसार उपयोगी वस्तूंसह स्त्रीधन असा सुमारे १ कोटी ५ लाखांचा मालाचा अपहार केल्याची घटना घडली. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई येथील जुहू परिसरात राहणारे पीडितेचा पती संशयित क्षितिज शिशीर बेथारीया (३२), सासरे शिशीर शामलाल बेथारीया (६०), सासू पल्लवी बेथारीया (५८) यांनी संगनमताने विवाहितेचा छळ केल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बँकेच्या संयुक्त बचत खात्यातून व्यवसायातील उत्पन्नाच्या रकमेवर पतीने पीडित विवाहितेची संमती न घेता परस्पर डल्ला मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या घटनेत विवाहिता सासरी नांदत असताना पती संशयित शुभम किशोर भरेकर (२७), सासू संगीता भरेकर (४६), सासरे किशोर भरेकर (५२,धनकवली पुणे) यांनी विवाहितेचा वारंवार छळ करत तिच्या वडिलांनी रिसॉर्टमध्ये लग्न लावून न दिल्याने विवाहितेला त्रास देत शिवीगाळ, मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सरकारवाडा पोलिसांनी फिर्यादीवरून पती शुभमसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चारचाकी मोटार खरेदीसाठी सासरच्या लोकांनी माहेरुन एक लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.