सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही बाब लक्षात येताच घारपुरे घाटाकडून रामवाडीकडे जाणाऱ्या पुलावर सिद्धेश्वर मंदिरालगत बघ्यांची गर्दी जमली. यावेळी पोलीस नियंत्रण कक्षाला काही जागरूक नागरिकांकडून गोदावरीत एका व्यक्तीने उडी घेतल्याचे कळविले. तेथून अग्निशमन दलाला माहिती मिळताच पंचवटी केंद्रावरील जवानांनी घटनास्थळी दाखल होत रबरी बोटीच्या साहाय्याने पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शाेध घेण्यास सुरुवात केली. तसेच यावेळी जीवरक्षक गोविंद तुपे यांनीही पाण्यात उतरून शोध घेतला. संध्याकाळी उशिरापर्यंत शोध घेतला जात होता; मात्र बुडालेली व्यक्ती हाती लागू शकली नाही.
दरम्यान, मालेगाव स्टॅन्ड येथील पोलीस चौकीत एका महिलेने धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्या महिलेने उडी घेणारा युवक हा तिचा पती दीपक अशोक परदेशी (२६, रा. नंदुरबार) असल्याचे सांगितले. त्या दोघांमध्ये न्यायालयात काही कारणावरून खटके उडाले. तेथून ते दुचाकीने पंचवटीकडे येत असताना पुन्हा रस्त्यात भांडण झाले. भांडणाचा राग आल्याने दीपक याने दुचाकी रामवाडी पुलावर उभी करून गोदावरीत उडी घेतली, अशी माहिती त्याच्या पत्नीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दीपकला पोहता येते
उडी घेणाऱ्या युवक दीपक यास पोहता येत असल्याची माहिती त्याच्या पत्नीने व स्थानिक मित्रांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे नदीपात्रात पाेहत नंतर काठावर येऊन बाहेर आला असावा आणि तेथून काढता पाय घेतला असावा, असाही अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. कारण गोदावरीची पाणी पातळी सध्या खूप नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. रामवाडी पुलापासून अहल्यादेवी होळकर पुलापर्यंत नदीपात्र पिंजून काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.