मालेगाव : अनैतिक संबंधाची समाजात वाच्यता करू नये म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पती संदीप नाना खैरनार, रा. टाकळी याचा गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीस ठाण्याच्या तपासात उघड झाला आहे.संदीप नाना खैरनार, रा. टाकळी याचा मृतदेह गेल्या २९ डिसेंबर २०१९ रोजी टाकळी शिवारातील शेतात बेवारस स्थितीत मिळून आला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरतीसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. सदरचा खून अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाल्याचा संशय बळावल्याने संदीप खैरनार याची पत्नी अर्चना संदीप खैरनार हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर अर्चना हिने तिचे माहेर चिखलओहोळ येथील विलास यशवंत जगताप याच्यासोबत कॉलेजपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतर एकमेकांपासून वेगळे झालो होतो; मात्र विलासच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. २८ डिसेंबर २०१९ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास विलास जगताप हा पती संदीप खैरनार घरी नसताना भेटण्यासाठी आला होता. त्याचवेळी संदीप खैरनार हा अचानक घरी आला. विलासला घरात पाहिल्यानंतर मला व विलासला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी झटापट झाली. प्रेमसंबंधाची वाच्यता बाहेर होऊ नये म्हणून संदीप याला मी व विलासने पलंगावर दाबून ठेवून विलास याने घरातील नायलॉनच्या दोरीने गळा आवळून जीवे ठार मारले. तसेच रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विलास याने संदीप खैरनार याचा मृतदेह दुचाकीवरून नेवून टाकळी फाट्यावरील रस्त्यालगतच्या काटेरी झुडपात टाकून दिला होता, अशी कबुली दिली. यावरून विलास यशवंत जगताप (३०) रा. चिखलओहोळ, ता. मालेगाव, हल्ली रा. उत्तमनगर, सिडको याला ताब्यात घेतले. त्यानेही खुनाची कबुली दिली आहे. अर्चना खैरनार व विलास जगताप यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सदर खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, स्वप्नील राजपूत, सुनील अहिरे, हवालदार रतिलाल वाघ, वसंत महाले, रवींद्र वानखेडे, दीपक अहिरे, राकेश उबाळे, हरीष आव्हाड, संदीप हांडगे, चेतन संवत्सरकर, अमोल घुगे, फिरोज पठाण, प्रदीप बहिरम, नारायणसिंग राजपूत, शैलेश बच्छाव, शरद मोगल, दीपाली बच्छाव आदींच्या पथकाने केला आहे.
प्रियकराच्या मदतीने पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 11:22 PM
अनैतिक संबंधाची समाजात वाच्यता करू नये म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पती संदीप नाना खैरनार, रा. टाकळी याचा गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीस ठाण्याच्या तपासात उघड झाला आहे.
ठळक मुद्देमालेगाव : टाकळी खून प्रकरणी दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई