नाशिक : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात लोखंडी फावडा मारत तिचा खून केल्यानंतर सुमारे ११वर्षांपासून फरार असलेला तिचा पती संशयित हल्लेखोर काशिनाथ बाळु पवार (६०) यास अखेर पंचवटी पोलिसांना बेड्या ठोकण्यास यश आले आहे. संशयिताबाबत कुठलेही ठोस पुरावे हाती नसताना केवळ गोपनीय माहितीवरुन दिंडोरी तालुक्यातील डंबाळेवाडी येथून पवार याच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या.सय्यद पिंपरी रस्त्यावर आडगाव शिवारातील येथील एका शेतात मोलमजुरी करत उदरनिर्वाह करणाऱ्या पवार दाम्पत्यामध्ये खटके उडाले. ११ ऑगस्ट 2010 रोजी दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी संशयित पवार याने त्याची पत्नी गुणीबाई पवार (४५) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर पवार हा फरार झालेला होता. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र तो कोठेही मिळून आला नाही. पवार मूळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहळ येथे राहणारा असून तो पहिल्यापासून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी काम करायचा पोलिसांनी त्याच्या मूळ गावीदेखील त्याचा शोध घेतला असता पवार हा गावाकडे येतच नसल्याने कदाचित तो मयत झाला असावा अशी शक्यता वर्तविली जात होती.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार गुन्हे शोध पथकाने काही महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहळ येथे जाऊन संशोधनाबाबत विचारपूस केली असता पवार दिंडोरी तालुक्यातील डंबाळेवाडी येथे एका शेतात मोलमजुरी करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या केवळ नावावरून शोध घेतला असता तो डंबाळेवाडीत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ११ वर्षांपूर्वी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली त्याने दिली. पवार यास बुधवारी (दि.१२) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पत्नीचा खून केल्यानंतर ११वर्षांपासून फरार असलेल्या पतीला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 6:06 PM
संशयित पवार याने त्याची पत्नी गुणीबाई पवार (४५) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर पवार हा फरार झालेला होता.
ठळक मुद्देदिंडोरीतून पंचवटी पोलिसांनी बांधल्या मुसक्याअकरा वर्षांपुर्वी घडला होता गुन्हा