नांदगांव : लग्न म्हटले की, दोन जीवांचे मिलन आणि ते टिकून राहण्यासाठी वटपूजनातून जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी प्रार्थना सौभाग्यवतींकडून केली जाते, परंतु सप्तपदीच्या वेळी होणाऱ्या पत्नीचा आयुष्यभर सांभाळ करेल, अशी शपथ घेणाऱ्या पतीकडून मात्र शपथभंग केला जातो, तेव्हा तो चर्चेचा विषय बनतो. अशीच एक घटना नांदगाव तालुक्यातील दर्हेल गावी घडली. पत्नीला धोका देऊन प्रेयसीसोबत पलायन करणाऱ्या आणि नंतर रंगेहाथ सापडलेल्या पतीला पत्नीने चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले. आता हे प्रकरण कोर्टाची पायरी चढण्याच्या तयारीत आहे.त्याचे झाले असे, दर्हेले येथे लग्नानंतर अडीच वर्षे कसाबसा संसार करणाऱ्या पत्नीला पती नीट वागवत नाही, नीट कामधंदा करीत नाही, म्हणून कुटुंबातील लोकांनी वेगळे काढून दिले. पती महोदयांनी स्वत:च्या जमिनीतून काही जमीन विकली आणि हाती पैसे खुळखुळू लागल्यानंतर चंगळवाद सुरू झाला. पतीराजाचे त्यातूनच एका मुलीशी प्रेमसंबध जुळले आणि घरात पत्नीशी खटके उडायला सुरुवात झाली. पत्नीने गावातील सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित यांना एकत्र जमवून बऱ्याचदा पतीला समजावण्याचा प्रयत्नही केला. पत्नी असताना प्रेयसीचा नाद सोड, म्हणून गावकऱ्यांनीही समजूत काढली, परंतु प्रेमात बुडालेल्या पतीराजाच्या ध्यानात हे उपदेशाचे बोल काही रुजेनात. प्रेमात वेडापिसा झालेला व पैशांच्या गुर्मीत पत्नीला माहेरी पाठवून देत, पतीराजाने प्रेयसीला घेऊन गावातून पलायन केले. तीन महिने उलटून गेल्यानंतर पसार झालेला पती एक दिवस दर्हेल गावी स्वत:च्या घरात प्रेयसीसोबत राहत असल्याची खबर दि. २० फेब्रुवारी रोजी पत्नीला कळाली. पत्नीने आपल्या वडिलांना सोबत घेत, दर्हेल गाव गाठले आणि पतीला प्रेयसीसोबतच घरात रंगेहात पकडले. आपले बिंग फुटले, म्हणून पतीने घरातून पळ काढला, परंतु अखेर तो पत्नीच्या हाती लागला. त्याला यथेच्छ चोप देत, तिने पतीला पोलिसांच्या ताब्यात देत फिर्याद दाखल केली.इन्फोवड पुजूनही गेली नाही खोडदर्हेल गावी सध्या याच प्रकरणाची चवीने चर्चा होत आहे. पत्नीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी व साता जन्माच्या गाठीसाठी वडपूजन केले, परंतु त्याची खोड काही गेली नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेषत: गावातल्या महिलावर्गाने याबाबत संतप्त भावना व्यक्त करत, सदर इसमाला कायद्याने धडा शिकवावा, अशी मागणी केली.