मानोरी : येथील जवान दिगंबर शेळके यांच्या अस्थींचे विसर्जन मंगळवारी (दि. २५) गोदावरी नदीत करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिवंगत शेळके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दिगंबर शेळके यांच्या पत्नी अनिता शेळके यांनी आपल्या पतीची आत्महत्या नसून त्यांची हत्याच झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. जवान दिगंबर शेळके यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर मंगळवारी गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शेळके यांच्या पत्नी अनिता यांना अश्रू अनावर झाले. अनिता शेळके यांनी सांगितले, माझे पती निर्दोष असून, त्यांच्याविरुद्ध मोठे कारस्थान रचून त्यांना अडकविण्यात आले आहे. त्यांना मागील एक महिन्यापासून सीआरपीएफ कमांडोमधील स्टोअर इन्चार्जची सूत्रे हाती घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, दिगंबर शेळके यांचे बंधू तुकाराम शेळके, एरंडगावचे सरपंच ज्ञानेश्वर भिसे, बाबासाहेब तिपायले, विजय मोरे, डॉ. संदीप शेळके,आनंदा भवर,अनिल भवर आदी उपस्थित ग्रामस्थांनीदेखील याप्रकरणी न्याय मिळण्याची मागणी केली आहे. सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना स्टोअरमधील कारभारात मोठी तफावत आढळून आली होती. त्याबाबत त्यांनी मला आणि माझ्या भावाला दूरध्वनीवरून स्टोअरच्या घोटाळ्याविषयी कल्पनाही दिली होती. स्टोअरमधील वस्तूच्या चौकशी दरम्यान ६० टक्केच वस्तू कार्यालयात आढळल्या होत्या. अद्याप ४० टक्के वस्तूंचा शोध लागलेला नाही. माझ्या पतीने देशाची २१ वर्षे सेवा केली असून, या काळात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग लागलेला नाही. संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी आपला बचाव करण्यासाठीच त्यांच्याविरुद्ध मोठे षडयंत्र रचून त्यांची हत्याच केली गेल्याचा आरोप अनिता शेळके यांनी केला आहे.
पतीची आत्महत्या नव्हे हत्याच! : पत्नी अनिता शेळके यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:17 AM