नाशिक : जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बडी दर्गा येथे सुरू असलेल्या अकरा दिवसीय वार्षिक उरुसाचा रविवारी (दि.२३) रात्री उशिरा समारोप झाला. अखेरच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.यंदा उन्हाळी सुटीत निवडणुका व त्यानंतर रमजान पर्व सुरू झाल्यामुळे बडी दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाकडून उरूस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १२ तारखेपासून बडी दर्गा येथे यात्रोत्सव सुरू झाला. या अकरा दिवसीय यात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. फालुदा, मालपोवा यांसारख्या एकापेक्षा एक विशिष्ट खाद्यपदार्थ विक्रेत्यांपासून खेळणी, सौंदर्य प्रसाधने विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. रहाट पाळण्यांचाही सादिकशाह हुसेनी जलकुंभाच्या आवारातील मोकळ्या जागेत भाविकांनी आनंद लुटला. खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयांची यात्रेत उलाढाल झाली. मागील अकरा दिवसांपासून दररोज सायंकाळी पाच वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत यात्रा बहरलेली पहावयास मिळत होती.अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने गेल्या शुक्रवारपासून भाविकांची मोठी गर्दी यात्रेत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. यात्रेनिमित्त दर्गा शरीफवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. जुन्या नाशकातील बडी दर्ग्याच्या उरुसाचे भाविकांना तसेच बालगोपाळांचे आकर्षण असते. उरूसमध्ये मिळणारा फालुदा या शीतपेयाला नागरिकांकडून मोठी मागणी मिळाली; मात्र यावर्षी फालुद्याची चव चाखताना महागाईचा सूर अनेकांच्या मुखातून बाहेर पडला.जुन्या नाशकातील रस्ते गर्दीने फुललेरविवारी अखेरचा दिवस असल्याने दुपारी चार वाजेपासूनच यात्रेला सुरुवात झाली होती. सायंकाळी पाच वाजता जुने नाशिकमधील पिंजारघाट, जोगवाडा, काजीपुरा, तांबट गल्ली या भागातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. आबालवृध्दांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून यात्रोत्सवाचा आनंद लुटला. रात्री उशिरा अकरा वाजेपर्यंत भाविकांची गर्दी बडी दर्गा परिसरात पहावयास मिळत होती. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने यात्रोत्सवानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यात्रेत हजेरी लावणाºया भाविकांनी कापडी चादरऐवजी फुलांच्या चादरी मजारशरीफवर अर्पण करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
हुसेनी बाबा यांच्या उरुसाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:42 AM