नाशिकरोड : देवीचौकातील सराफ व्यावसायिक राहुल शहाणे यांना गुन्ह्यातील चौकशीसाठी घेऊन जाणाºया हैदराबाद पोलिसांचा अद्याप उलगडा न झाल्याने हैदराबादी पोलिसांचे गूढ कायम आहे़ दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीचौक सराफ बाजारातील धनश्री ज्वेलर्सचा संचालक राहुल बंडोपंत शहाणे या सराफी युवकाच्या मोबाइलवर शुक्रवारी (दि़२७) दुपारी फोन करून अज्ञात इसमांनी पांढºया रंगाच्या बोलेरो गाडी (एमएच १७ पूर्ण क्रमांक नाही) जवळ बोलविले. हैदराबाद पोलीस असल्याचे सांगत राहुल यास एका गुन्ह्यासंदर्भात चौकशीसाठी गाडीत बसवून नेले़ यानंतर राहुलच्या मोबाइलवरून सहायक पोलीस आयुक्तमोहन ठाकूर यांनाही हैदराबादचे पोलीस असून, राहुल शहाणे यास घेऊन जात असल्याचे सांगितले़ त्यांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्याबाबत सांगितले मात्र त्यांनी शहरापासून दूर आल्याचे सांगितले़ नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना सदर घटनेची माहिती ठाकूर यांनी देताच ते देवीचौकात पोहोचले़ त्यांनी तेथील सराफी व्यावसायिकांकडून माहिती घेतल्यानंतर राहुल शहाणे यास बोलेरो गाडीत घेऊन गेल्याचे सांगितले़ मात्र, कायदेशीर तरतुदीनुसार स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती देऊन नोंद केली नाही़ राहुलला घेऊन जाणारे नक्की पोलीसच आहेत का? याबाबत माहिती मिळत नसल्याने सराफ व्यावसायिक असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी चौकशी केली, मात्र पोलिसांकडे उत्तर नव्हते़ रात्री दहा वाजेनंतर पोलिसांनी राहुलच्या मोबाइलवर फोन केल्यानंतर हैदराबादला घेऊन जात असल्याची माहिती दिली़ नाशिकरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रूपेश काळे, पोलीस नाईक संदीप बागुल, राहुलचे नातेवाईक अशोक डहाळे, निवृत्ती मैंद हे खासगी वाहनाने रात्री ११ वाजता हैदराबादला रवाना झाले. मात्र शनिवारी (दि़२८) सायंकाळपर्यंत हे पथक राहुलला घेऊन हैदराबादला पोहोचलेले नव्हते तसेच त्यांच्याकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने याप्रकरणाचे अद्यापही गूढ कायमच होते़ दरम्यान, तेलंगणा राज्यातील काझीपेठ रेल्वे पोलीस ठाण्यातील हे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, काझीपेठ रेल्वे पोलीस ठाण्याचे मुख्यालय सिकंदराबाद असल्याने तेथे पथक पोहचल्यानंतरच उलगडा होईल, असे ढोकणे यांनी सांगितले.अपहरणाचा गुन्हा दाखलजेलरोड येथील संतोष राजाभाऊ डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली हैदराबाद पोलीस असल्याचे सांगून परस्पर सराफ राहुल शहाणे याला घेऊन जाणाºया इसमाविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली स्थानिक पोलिसांना माहिती न देता, विश्वासात न घेता झालेल्या प्रकारामुळे पहिल्यांदाच असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराफ चौकशीबाबत हैदराबाद पोलिसांचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:10 AM