सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान असल्याने यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटले आहेत. या पार्श्वभूमीवर गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानचे रोहित जाधव यांनी युवकांसह कंधाणे येथील वरदर शिवारातील होळकर धाटणीच्या ‘बारव’ची ‘जागतिक जलदिना’निमित्त स्वच्छता केली. टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांनी पाण्याचे महत्त्व ओळखून दुष्काळावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी बारव (पायविहिरी) बांधल्या. नद्या-नाले बारमाही प्रवाहित राहण्यासाठी या बारव मोठे काम करायच्या. त्यामुळे या बारव जनहिताच्या होत्या.दुर्गवीर प्रतिष्ठानचे रोहित जाधव हे सध्या भूजलशास्त्राचा अभ्यास करीत असून, तालुक्यातील १२८ बारवांचा शोध घेऊन त्यांची नोंद लावण्याचे काम करीत आहे. पाणी हे जीवन असून, बारवांचे महत्त्व व रचना याबद्दल जाधव यांनी कंधाणे येथील वरदर शिवारातील स्थानिक युवकांना माहिती दिली. युवकांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून ऐतिहासिक विहिरीची साफसफाई केली. आजूबाजूचा कचरा-वाळलेली झाडे बाजूला करून सर्व पायऱ्या मोकळ्या केल्या. विहिरीतील वर्षांनुवर्षे जीर्ण झालेली माती व गाळ काढत असताना साधारण वरील जमिनीपासून तीस फुटांखाली व शेवटच्या पायरीपासून खाली ५ फुटांखाली पाण्याचा जिवंत झरा सापडला. त्यामुळे सर्वांचा आनंद ओसंडून वाहत होता. या पायविहिरीची धाटणी बघता ती १७६५-७५ या कालावधीतील असू शकते. श्रमदानात दादासाहेब बिरारी, सुयोग बिरारी, संदीप बिरारी, समाधान बिरारी, राजवर्धन बिरारी, नितीन सूर्यवंशी, शांताराम बिरारी, गिरीश मांडवडे आदी युवकांनी सहभाग घेतला.ऐतिहासिक विहिरींचे जतनबागलाण तालुक्यात एकूण १२८ पायविहिरी आहेत. त्यांच्यातील गाळ काढून संवर्धन केले तर पाण्याचा नैसर्गिक स्रोत सापडेल. नवे धरण बांधण्याची गरज येणार नाही. शिवार ओले होऊन जंगले वाढतील टंचाईची भीतीदेखील नाहीशी होईल. याकरिता गावागावांतील सर्व आबालवृद्धांनी एकत्र येऊन दुष्काळाविरु द्ध लढा देऊन ऐतिहासिक विहिरींचे जतन व संवर्धन केले पाहिजे.
जलदिनी केली कंधाणेतील ऐतिहासिक बारवची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:47 AM